Maharashtra New Expressway : राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्याला लवकरच एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. खरे तर पुणे जिल्ह्यातील वाहतुकीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी आणि जिल्ह्यातील प्रादेशिक संपर्क आणि पायाभूत सुविधा विकासासाठी जिल्ह्यात एक नवीन महामार्ग विकसित होणार असून या महामार्ग प्रकल्पाला फडणवीस सरकारकडून ग्रीन सिग्नल सुद्धा मिळालेला आहे.
त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की फडणवीस सरकारने तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी 4206.88 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत.
हा नवा महामार्ग मुंबई-पुणे महामार्ग म्हणजे NH-48 व पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्ग म्हणजे NH-753 या दोन महत्त्वाच्या महामार्गांना जोडणी देणार आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील या संबंधित भागातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय आहेत?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या माध्यमातून तळेगाव ते चाकण चार लेनचा उन्नत रस्ता व त्यासोबत चार लेनचा जमिनीवरील रस्ता विकसित होणार आहे. तसेच, चाकण ते शिक्रापूर दरम्यान सहा लेनचा नवा रस्ता विकसित होणार आहे.
या प्रकल्पाची एकूण लांबी 53 किलोमीटर इतकी राहणार असून हा संपूर्ण प्रकल्प बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर म्हणजेच बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर तयार केला जाणार असल्याची माहिती देण्यात.
या प्रकल्पाचे काम एम एस आय डी सी म्हणजेच महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ करणार असून यामुळे पुण्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. हा महामार्ग पुण्याच्या आउटर रिंग रोड प्रमाणेच काम करेल असे बोलले जात आहे.
या नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या एक्सप्रेस वे मुळे चाकण एमआयडीसीमधील औद्योगिक कंपन्यांना मोठा फायदा होणार असा आशावाद व्यक्त करण्यात आला असून हा नवा प्रकल्प वाहतुकीचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी करणार आहेत. महत्वाची बाब अशी की, यासाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे व पर्यावरण मंजुरीनंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे.