Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्रात विविध महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत आणि अजूनही अनेक प्रकल्पांची कामे युद्धपातळीवर सुरूच आहेत. अशातच आता महाराष्ट्रातुन जाणाऱ्या एका महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पाला येत्या एका महिन्यात मंजुरी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एकीकडे राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विकसित होणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे आणि येत्या काही दिवसात समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे तर दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे प्रकल्पाला येत्या महिन्याभरात मंजुरी मिळणार अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

मंत्री नितीन गडकरी हे अलीकडेच शिर्डी येथे आले होते यावेळी त्यांनी ही माहिती दिली असून आज आपण सुरत – चेन्नई ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे प्रोजेक्ट नेमका कसा आहे ? या प्रकल्पाचा महाराष्ट्राला काय फायदा होणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुढील 30 दिवसात सुरु होणार काम ?
सुरत चेन्नई ग्रीन फील्ड महामार्ग प्रकल्पाला येत्या 30 दिवसात मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यामुळे या महामार्ग प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असे चित्र तयार होत आहे. खरंतर हा बहुचर्चित महामार्ग प्रकल्प गेल्या काही काळापासून भूसंपादनामुळे रखडला होता.
पण आता पुन्हा एकदा हा प्रकल्प चर्चेत आला असून येत्या काही दिवसात या प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याची माहिती हाती येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाचा प्रस्ताव पुन्हा एकदा कॅबिनेटच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला असून येत्या 30 दिवसात या प्रस्तावाला मंजुरी मिळणार अशी माहिती दिली आहे.
कसा आहे प्रकल्प?
सुरत – चेन्नई ग्रीन फील्ड महामार्ग आपल्या महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या जिल्ह्यांमधून प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग राज्यातील नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, अक्कलकोट, बीड आणि धाराशिव या भागातून जाणार आहे.
या महामार्गाची एकूण लांबी 1600 km इतकी असून या प्रकल्पासाठी जवळपास 42 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.
या महामार्ग प्रकल्पामुळे सुरत ते चेन्नई हा प्रवास वेगवान होणार आहे सोबतच दिल्ली ते चेन्नई या दोन शहरांमधील प्रवासाचे अंतर 350 किलोमीटरने कमी होईल अशी शक्यता आहे. हा महामार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नाशिक ते सोलापूर हे अंतर 135 किलोमीटरने कमी होणार असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे.
तसेच सुरत ते चेन्नईचे अंतर सुद्धा 320 किलोमीटरने कमी होणार आहे. या महामार्गाबाबत सांगायचं झालं तर याची लांबी नाशिक जिल्ह्यात 122 किलोमीटर, अहिल्यानगर जिल्ह्यात 141 किलोमीटर, बीड जिल्ह्यात 38 किलोमीटर आणि धाराशिव जिल्ह्यात 86 किलोमीटर एवढी प्रस्तावित आहे.