Maharashtra New Expressway : मुंबई ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग. या महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर इतकी असून सध्या याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. खरंतर या महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा आधीच वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.
डिसेंबर 2022 मध्ये या महामार्गाचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला होता. नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा पहिल्यांदा वाहतुकीसाठी सुरू झाला आणि त्यानंतर 2023 मध्ये शिर्डी ते भरवीर हा 80 km लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.

पुढे 2024 मध्ये या महामार्गाचा 25 किलोमीटर लांबीचा भरवीर ते इगतपुरी हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला आणि आता शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी-आमणे टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या अंतिम टप्प्यातील कामे सुरू आहेत.
यामुळे आता लवकरच समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एप्रिलअखेर हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन केले असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.
मात्र, अधिकृत उद्घाटन होण्याआधीच या महामार्गावर वाहने धावू लागली असून, त्यामुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे ही अनधिकृत वाहतूक थांबवणे अतिशय आवश्यक असून याच संदर्भात एमएसआरडीसीला योग्य त्या उपाययोजना आता कराव्या लागणार आहेत.
महामार्गावरील पाच बोगद्यांसह संपूर्ण टप्प्यावर स्थानिकांसह बाहेरून येणाऱ्या वाहनांची वर्दळ सुरू असल्याचे समोर आले आहे. चारचाकी वाहनांसोबत ट्रकही या मार्गावरून प्रवास करत आहेत. महामार्ग अद्याप वाहतुकीसाठी अधिकृतरीत्या सुरू करण्यात आलेला नसतानाही सर्रासपणे वाहनांची ये-जा सुरू असून, दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
पण आता एमएसआरडीसीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या महामार्गावर अनधिकृत वाहनांना प्रवेशबंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक वाहनचालक जबरदस्तीने आणि सुरक्षा रक्षकांवर दबाव टाकून महामार्गाचा वापर करत असल्याचेही समोर आले आहे.
त्यामुळे मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांना महामार्ग पूर्णत: बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अनधिकृत वाहनांवर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. महामार्गावरील सर्वात मोठ्या बोगद्याला प्रवेशद्वार असून ते बंद करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित चार लहान बोगद्यांना प्रवेशद्वार नसल्याने त्याद्वारे वाहनांची वर्दळ सुरूच राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे अनधिकृत वाहने रोखण्यासाठी एमएसआरडीसी कोणती पावले उचलणार, याकडे लक्ष लागले आहे. परंतु एप्रिल अखेरीस इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी दाखल होणार असून यामुळे मुंबई ते नागपूर या दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे.