Maharashtra New Expressway : 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजित झाल्यानंतर देशातील इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यावर शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून देशभरातील रस्ते आणि रेल्वेचे नेटवर्क स्ट्रॉंग बनवले जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीतून देशभरात अनेक मोठमोठ्या महामार्गांचे कामे पूर्ण झाली आहे.
मात्र आजही अशा काही रस्त्यांची कामे आहेत जी अपूर्ण अवस्थेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून देशातील काही रस्त्यांचे काम सुरू आहे पण वेगवेगळ्या कारणांमुळे या रखडलेल्या रस्त्यांचे काम पूर्ण होत नाहीये. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प देखील असाच एक प्रकल्प आहे.

अशातच आता रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या बाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. याचे काम यंदाच्या जूनपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच दिली आहे.
नक्कीच जून 2025 मध्ये हा महामार्ग सुरू झाला तर मुंबई ते कोकण आणि गोवा याकडील प्रवास वेगवान आणि सुलभ होणार आहे. मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की गडकरी अमर हिंद मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेत दादर येथे बोलत होते अन यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. खरंतर याआधीही या महामार्गाबाबत वेगवेगळ्या घोषणा झाल्यात. हा महामार्ग डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट सरकारने ठेवले होते.
आधीची डेडलाईन हुकल्यानंतर आता गडकरी यांनी एक नवीन डेडलाईन दिली आहे. गडकरी म्हणालेत की, “मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अनेक अडचणी आल्या. जमीन संपादनात भाऊ-भावांमध्ये वाद, न्यायालयीन खटले आणि नुकसानभरपाईच्या गुंतागुंतीमुळे काम रखडले.
मात्र आता सर्व अडथळे दूर झाले असून काम वेगाने सुरू आहे.” ते पुढे म्हणाले की, हा महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई ते गोवा प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होईल आणि कोकणातील विकासाला मोठा चालना मिळेल. याच कार्यक्रमात मंत्री गडकरी यांनी देशभरातून लवकरच सर्व टोल नाक्यांचे उच्चाटन होईल असेही जाहीर केले आहे.
तसेच, पुढील पंधरा दिवसांत नवीन टोल धोरण जाहीर केले जाईल. त्यानुसार सॅटेलाईट ट्रॅकिंग आणि वाहनांच्या नंबर प्लेट ओळख प्रणालीद्वारे थेट बँक खात्यातून टोल कपात केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
गडकरी यांनी यावेळी असेही आश्वासन दिले की पुढील दोन वर्षांत भारताची रस्ते वाहतूक पायाभूत सुविधा अमेरिका पेक्षा सुद्धा चांगली असेल. नक्कीच आता मंत्री नितीन गडकरी यांच्या या घोषणेप्रमाणे जून 2025 मध्ये हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होणार का ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी ठरणार आहे.