महाराष्ट्राला गुजरात आणि मध्य प्रदेश सोबत जोडणाऱ्या ‘या’ महामार्गाचे चौपदरीकरण होणार ! कोण-कोणत्या गावांमधून जातो महामार्ग ?

राज्याला लवकरच एक चार पदरी महामार्ग मिळणार आहे. हा महामार्ग उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यांमधून जाणार असून या महामार्ग प्रकल्पामुळे मध्य प्रदेश आणि गुजरात हे दोन राज्य आपल्या राज्याला जोडले जाणार आहेत.

Published on -

Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला गुजरात आणि मध्यप्रदेश सोबत जोडणारे एका महत्त्वाच्या महामार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रातून गुजरात आणि मध्य प्रदेशला जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयानंतर आगामी काळात या तिन्ही राज्यादरम्यानचा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून तळोदा ते ब-हाणपूर महामार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. खरे तर हा मार्ग रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील काही गावांतून जाणार होता.

जानेवारी 2022 आणि नोव्हेंबर 2023 च्या अधिसूचनेत हा मार्ग कोणत्या गावांमधून जाणार हे निश्चित झाले होते. पण या मार्गे महामार्ग करण्याबाबत संबंधित गावांमधील स्थानिकांचा मोठा विरोध होता. महत्त्वाचे म्हणजे रावेर शहरातून किंवा रावेरला लागून हा महामार्ग जाणार नव्हता.

यामुळे रावेर व आजूबाजूच्या परिसरात या संदर्भात तीव्र नाराजी पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर संबंधित स्थानिकांच्या माध्यमातून आंदोलने देखील झाली होती. म्हणूनच आता या महामार्गाच्या रूट मध्ये बदल झाला आहे.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत हा महामार्ग रावेर तालुक्यातील भातखेडे, रावेर, कोंद, पातोंडी, पुनखेडे, तामसवाडी, खिरवड, वाघोड, मोरगाव खुर्द, मोरगाव बुद्रुक, अटवाडे, अजनाड, खानापूर, चोरवड या गावांमधून जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यामुळे या संबंधित भागांमधील नागरिकांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून या महामार्गामुळे या परिसराच्या विकासाला नवीन दिशा मिळणार आहे.

खरेतर, या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी केंद्रीय सडक परिवहन राजमार्ग मंत्रालयाने राजपत्र प्रसिद्ध केले आहे ज्यात रावेर तालुक्यातील वर सांगितलेल्या 15 नवीन गावांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आता या संबंधित नवीन गावांमधील जमिनीचे संपादन होणार असून यासाठी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. आता मंत्रालयाकडून या महामार्गात बदल झालेल्या गावांचा समावेश करून महामार्गात जाणाऱ्या जमिनींचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी अधिसूचना जारी झाली आहे.

या महामार्गाची नंदुरबार जिल्ह्यातील लांबी 58 किलोमीटर, धुळे जिल्ह्यातील लांबी 48 किलोमीटर आणि जळगाव जिल्ह्यातील लांबी 120 किलोमीटर इतकी राहणार आहे. या महामार्गाची गुजरातमधील लांबी 7 km आणि मध्य प्रदेश मधील लांबी फक्त 13 किलोमीटर इतकी आहे.

नक्कीच या महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे राज्याच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील विकासाला चालना मिळणार आहे. कृषी उद्योग शिक्षण पर्यटन अशा सर्वच क्षेत्रांना या महामार्ग प्रकल्पाचा फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe