Maharashtra New Expressway : केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला एक मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटच्या आर्थिक व्यवहार समितीने महाराष्ट्रातील एका नव्या ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पास मान्यता दिली आहे. यामुळेमहाराष्ट्रातील रस्ते कनेक्टिव्हिटी आणलहू मजबूत होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रातील मोदी सरकारने मुंबईमधील जवाहरलाल नेहरू पोर्ट अॅथॉरिटी (JNPA) पोर्ट, पागोटे आणि चौक दरम्यान संपर्क सुधारण्यासाठी हा सहा-लेन एक्सप्रेसवे उभारण्याचा निर्णय घेतला असून याच प्रकल्पाला आता मंजुरी सुद्धा दिलेली आहे.

दरम्यान आता आपण या नव्या महामार्ग प्रकल्पाची माहिती जाणून घेणार आहोत. खरेतर, हा एक्सप्रेस वे 4500 कोटी रुपयांच्या खर्चासह म्हणजेच 45 अब्ज रुपयांच्या गुंतवणुकीसह विकसित होणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी जवळपास 30 किलोमीटर इतकी असेल.
29.21 किमी लांबीचा हा महामार्ग ‘बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर’ (BOT) मॉडेलअंतर्गत विकसित केला जाणार आहे. हा प्रकल्प पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनशी संलग्न असून, एकात्मिक पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने राबवला जात आहे.
JNPA पोर्टवरील वाढती कंटेनर वाहतूक आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर होणारी वाहतूक वाढ लक्षात घेऊन हा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. सध्या JNPA पोर्ट, राष्ट्रीय महामार्ग-48 आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गादरम्यानचा दोन ते तीन तासांचा प्रवास ट्रॅफिक जाममुळे लांबणीवर पडतो.
पळस्पे फाटा, डी-पॉइंट, कलंबोली जंक्शन आणि पनवेल येथे रोज 1.8 लाख वाहनांची वर्दळ होत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होते. हा नवीन महामार्ग NH-48 (मुंबई-पुणे महामार्ग) आणि NH-348 (JNPA पोर्ट, पागोटे गाव) यांना जोडेल तसेच NH-66 (मुंबई-गोवा महामार्ग) आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेशी जोडणी निर्माण करेल.
सह्याद्री पर्वतातील कठीण घाट भाग टाळण्यासाठी दोन बोगदे तयार करण्यात येणार आहेत, ज्यामुळे जड वाहनांसाठी प्रवास अधिक सुकर होईल. या महामार्गामुळे मालवाहतुकीची कार्यक्षमता सुधारेल, पोर्टशी जोडणी अधिक गतीशील होईल आणि मुंबई-पुणे परिसरातील आर्थिक वाढीस चालना मिळेल.
दरम्यान, 500 अब्ज रुपयांचा पुणे-बेंगळुरू एक्सप्रेसवे देखील लवकरच साकारला जाणार आहे. 700 किमी लांबीचा हा महामार्ग सध्या 15 तास लागणारा प्रवास केवळ 7 तासांवर आणणार आहे. NH-48 च्या तुलनेत हा जलद आणि अधिक कार्यक्षम दळणवळण मार्ग ठरेल, ज्यामुळे प्रवाशांसह व्यापाऱ्यांनाही मोठा फायदा होईल.
नक्कीच या महामार्ग प्रकल्पाचा मुंबईला तर मोठा फायदा होणारच आहे शिवाय मुंबई ते पुणे आणि मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी देखील हा महामार्ग फायद्याचा राहणार आहे. त्यामुळे राज्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार असून कृषी पर्यटन उद्योग अध्यात्म अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना याचा फायदा होईल.