Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. पुण्याला आणि अहिल्या नगरला देखील अनेक महामार्ग प्रकल्प मिळालेत. अहिल्यानगर हे तर उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना रस्ते मार्गाने जोडणारे एक महत्त्वाचे केंद्रबिंदू शहर आहे.
या शहरातुन उत्तरेकडे जाण्यासाठी आणि दक्षिणेकडे जाण्यासाठी अनेक महामार्ग उपलब्ध आहेत. अशातच आता पुणे आणि नगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ते म्हणजे केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रासाठी एका मोठ्या आणि महत्त्वपूर्ण महामार्ग प्रकल्पाची घोषणा केली आहे.

नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला लवकरच पंधरा हजार कोटी रुपयांचा महामार्ग प्रकल्प मिळणार असल्याची घोषणा केली असून हा महामार्ग प्रकल्प राज्यातील पुणे, नगर आणि छत्रपती संभाजी नगर या तीन जिल्ह्यांना जोडणार आहे. हा महामार्ग पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा राहणार आहे.
या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल. सध्या पुण्याहून छत्रपती संभाजी नगरला जायचे असेल तर सात तासांचा वेळ लागतो मात्र जेव्हा हा नवा महामार्ग विकसित होईल तेव्हा हा प्रवासाचा वेळ पाच तासांनी कमी होणार आहे. या महामार्गाच्या निर्मितीनंतर पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या दोन तासात शक्य होईल.
यामुळे मराठवाड्यातील जनतेला जलद गतीने पुण्यात पोहोचता येणार आहे. संसदेत बोलताना नितीन गडकरी यांनी स्वतः हा नवीन द्रुतगती महामार्ग विकसित करण्याची घोषणा केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की संसदेत ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री महोदयांनी या प्रकल्पाची माहिती दिली.
त्यांनी स्पष्ट केले की, पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान हा महामार्ग प्रवासाचा वेळ कमी करण्यासोबतच इंधन बचतीस मदत करेल आणि औद्योगिक कनेक्टिव्हिटी सुद्धा सुधारेल. या प्रकल्पामुळे पुणे, नगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमधील आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल. हा महामार्ग प्रकल्प यासंबंधी जिल्ह्यांमधील कृषी उद्योग शिक्षण पर्यटन अशा सर्वच क्षेत्रासाठी फायद्याचा राहणार आहे.
या तीनही जिल्ह्यांचा एकात्मिक विकास या महामार्ग प्रकल्पामुळे शक्य होईल. विशेषतः मराठवाड्यासाठी हा प्रोजेक्ट फारच फायद्याचा राहणार आहे. गडकरी यांनी देशातील रस्ते विकासाच्या व्यापक योजनांची माहिती देताना महामार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.
तसेच, आगामी दोन वर्षांत देशभरातील सुमारे 25 हजार किलोमीटर लांबीचे दुपदरी रस्ते चौपदरी करण्यात येणार असून, सध्याचे चौपदरी रस्ते सहापदरी करण्याचीही योजना आहे. यामुळे देशभरातील रस्ते अधिक सक्षम होतील. महाराष्ट्रातील रस्ते अपघातांच्या वाढत्या संख्येबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आणि अपघात नियंत्रणासाठी सरकारच्या उपाययोजनांची माहिती दिली.
वाहनांचा अति वेग, गाडी चालवताना मोबाईलचा वापर, मद्यपान करून वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणे आणि रस्त्यांची खराब स्थिती ही प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. महामार्ग मंत्रालय विविध उपाययोजना राबवत असून, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.