Maharashtra New Expressway : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण केले. या लोकार्पणानंतर म्हणजेच इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण पूर्ण झाल्यानंतर आता नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग पूर्णपणे सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे.
समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून या नव्या महामार्ग प्रकल्पामुळे नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास अवघ्या आठ तासात शक्य झाला आहे. समृद्धी महामार्ग राज्यातील 12 हुन अधिक जिल्ह्यांना प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या कनेक्ट करतोय.

दुसरीकडे आता याच समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे ती म्हणजे समृद्धी महामार्गाचा आणखी विस्तार होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आता विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापर्यंत विस्तारला जाणार आहे.
समृद्धी महामार्ग गोंदिया जिल्ह्याला जोडला जाणार असल्याने यामुळे विदर्भाचा एकात्मिक विकास सुनिश्चित होईल असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त होतोय. समृद्धी महामार्ग गोंदिया जिल्ह्याला जोडण्यासाठी एक नवा मार्ग विकसित केला जाणार असून आज आपण याच नागपूर गोंदिया समृद्धी महामार्ग प्रकल्पाची डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.
कसा असणार नवा मार्ग ?
या नव्या मार्गाबाबत बोलायचं झालं तर हा मार्ग 163 किलोमीटर लांबीचा राहणार असून या प्रकल्पासाठी 21,670 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पूर्ण केले जाणार आहे.
या नवीन एक्सप्रेस वे मुळे नागपूर ते गोंदिया हा प्रवास वेगवान होणार असून या मार्गाची सुरुवात जामठा जवळील वर्धा रोडवरील गवसी मानापुर गावातून होणार आहे. या ठिकाणीच वर्धा रोड बाह्य रिंगरोडशी जोडण्यात आला आहे. महत्त्वाची बाब अशी की समृद्धी महामार्गावरील शिवमडका येथील इंटरचेंज येथून फक्त पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे.
हा एक्सप्रेस वे गावसी मानापुर ते गोंदिया शहराजवळील सावरी या गावापर्यंत राहील. याची एकूण लांबी 145 किलोमीटर इतकी असेल. पण, नागपूर ते गोंदिया मुख्य मार्गाव्यतिरिक्त या प्रकल्पाच्या माध्यमातून तिरोडाला जोडणाऱ्या 14 किलोमीटरचा आणि गोंदिया जवळ 4 km लांबीचा बायपास तयार केला जाणार आहे.
अशा तऱ्हेने हा प्रकल्प 163 किलोमीटर लांबीचा बनतो. या प्रकल्पासाठी नागपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांमध्ये जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. या प्रकल्पासाठी 1,600 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. दरम्यान, सध्या स्थितीला या प्रकल्पासाठी जमीन मोजमाप सर्वेक्षण सुरू असून लवकरच हे काम पूर्ण केले जाईल.
महत्वाची बाब म्हणजे या प्रकल्पासाठी जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर मग यासाठीची टेंडर प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतर मग वर्क ऑर्डर दिले जातील आणि वर्क ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर संबंधित कंपनीला अवघ्या 30 महिन्यांच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे टार्गेट दिले जाणार आहे.
नागपूर – गोंदिया प्रवास होणार सुपरफास्ट !
सध्या स्थितीला अस्तित्वात असणाऱ्या मार्गाने नागपूर ते गोंदिया हा प्रवास जर करायचा असेल तर प्रवाशांना जवळपास साडेतीन तासांचा वेळ लागतो. पण जेव्हा समृद्धी महामार्गाचा गोंदियापर्यंत विस्तार होईल म्हणजेच नागपूर ते गोंदिया हा 163 किलोमीटर लांबीचा नवा एक्सप्रेस वे तयार होईल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी दोन ते अडीच तासांवर येण्याची शक्यता आहे.