9 तासांचा प्रवास फक्त 4 तासात ! महाराष्ट्रात तयार होणार नवीन एक्सप्रेस वे, कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार नवा महामार्ग ?

राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. या भागातील नागरिकांना भविष्यात एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. 

Published on -

Maharashtra New Expressway : सध्या स्थितीला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक ते पश्चिम महाराष्ट्रातील अक्कलकोट यादरम्यानचा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना जवळपास नऊ तासांचा वेळ लागतोय. मात्र लवकरच हा प्रवासाचा कालावधी चार तासापर्यंत कमी होणार आहे. कारण राज्याला एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे.

सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे आपल्या महाराष्ट्रातून जाणार असून या प्रकल्पामुळे नाशिक ते अक्कलकोट या दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. सुरत – चेन्नई ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे प्रकल्पातील रखडलेल्या नाशिक ते अक्कलकोट या मार्गाचा तिढा नुकताच सोडवण्यात आला आहे.

खरंतर हा प्रकल्प आता बीओटी म्हणजेच बिल्ड ऑपरेटर ट्रान्सफर या तत्त्वावर केला जाणार आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर हा प्रकल्प विकसित होणार असल्याने यामुळे सरकारचा मोठा खर्च वाचणार आहे आणि दुसरीकडे या नव्या निर्णयामुळे या प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण होईल अशी आशा आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून नाशिक ते अक्कलकोट दरम्यानच्या मार्गाचे काम BOT तत्त्वावर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा प्रस्ताव केंद्रातील सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान केंद्रातील सरकारकडून याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

कसा आहे प्रकल्प?

सुरत – चेन्नई ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे. या महामार्गाची लांबी 1271 किलोमीटर इतकी आहे. हा मार्ग महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधून जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, मराठवाड्यातील बीड, धाराशिव अन पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या पाच जिल्ह्यांमधून हा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.

सुरत – चेन्नई ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे चे दोन भाग करण्यात आले आहेत. या मार्गाचे सुरत ते सोलापूर आणि सोलापूर ते चेन्नई असे दोन महत्त्वाच्या टप्पे करण्यात आले आहेत. या महत्त्वाच्या दोन टप्प्यांचे आणखी काही टप्पे करण्यात आले आहेत.

यातीलच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे नाशिक ते अक्कलकोट. नाशिक – अक्कलकोट या टप्प्याचे सुद्धा नाशिक ते अहिल्यानगर आणि अहिल्यानगर ते अक्कलकोट असे दोन सेक्शन आहेत. नाशिक – अक्कलकोट या टप्प्याचे एकूण अंतर 374 किलोमीटर इतके आहे.

यातील नाशिक ते अहिल्यानगर दरम्यानच्या टप्प्याचे अंतर 152 किलोमीटर आणि अहिल्यानगर ते अक्कलकोट या टप्प्याचे अंतर 222 किलोमीटर इतके आहे. हा एक सहा पदरी महामार्ग आहे. खरे तर, सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून नाशिक ते अक्कलकोट या टप्प्यासाठी हायब्रिड अॅन्युइटी माॅडेलनुसार निविदा जारी करण्यात आली होती.

मात्र काही कारणास्तव हे निविदा प्रक्रिया रद्द झाली. त्यानंतर मग हा मार्ग बीओटी म्हणजे बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर या तत्त्वावर तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी मूल्यांकन समितीने नाशिक – अक्कलकोट महामार्गाला मंजुरी देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

या समितीने मंजुरी दिल्यानंतर आता हा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. केंद्राकडून मंजुरी मिळाल्यानंतर मग या प्रकल्पाची पुढील कार्यवाही सुरू होणार आहे. नाशिक – अक्कलकोट दरम्यानच्या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास फक्त चार तासांमध्ये पूर्ण होणार आहे म्हणजेच प्रवासाचे एकूण पाच तास वाचणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!