Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला मिळणार ५२३ किलोमीटर लांबीचा आणखी एक नवा महामार्ग ! कसा असणार रूट ?

महाराष्ट्राला आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. येत्या तीन वर्षात ५२३ किलोमीटर लांबीचा नवा रेवस ते रेड्डी हा सागरी महामार्ग पूर्णपणे बांधून तयार होणार असल्याचा दावा सरकारकडून केला जातोय.

Published on -

Maharashtra New Expressway : तीस वर्षात जे कोणाला जमलं नाही ते मुख्यमंत्री फडणवीस करून दाखवणार आहेत. तीस वर्षांपासून रखडलेला महामार्ग येत्या तीन वर्षात बांधून तयार होणार असल्याचा दावा फडणवीस सरकारमधील मंत्र्यांकडून केला जातोय. त्यामुळे राजाला आणखी एक नवीन महामार्ग मिळणार आहे.

खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात विविध महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. कोकणाच्या विकासाला चालना देणारेही अनेक प्रकल्प गत काही वर्षांमध्ये पूर्ण झाले आहेत. मात्र, गेली तीन दशके कोकणातील एक महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्प रखडलाय.

रेवस ते रेड्डी असा हा महामार्ग प्रकल्प असून या ५२३ किलोमीटर लांबीच्या चारपदरी सागरी महामार्गाच्या कामाला आता तीन दशकानंतर पहिल्यांदा गती मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात अर्थातच विधान परिषदेत मंत्री दादा भुसे यांनी या महामार्गाच्या संदर्भात मोठी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी हा महामार्ग प्रकल्प लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन सुद्धा दिले आहे.

खरेतर, सभागृहात भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामावर आवाज उठवत खर्च १० हजार कोटींपेक्षा जास्त झाल्याची बाब अधोरेखित केली अन आपल्या सरकारचे लक्ष वेधले.

यावर उत्तर देताना मंत्री भुसे यांनी महामार्गाच्या कामाची माहिती दिली. भुसे म्हणालेत की, सध्या महामार्गाची रुंदी विविध ठिकाणी वेगवेगळी आहे. मात्र, नवीन प्रकल्पाअंतर्गत हा संपूर्ण महामार्ग चार पदरी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे.

आता या प्रकल्पासाठी अंदाजे २६ हजार ४६३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महामार्गामुळे कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ९३ पर्यटनस्थळे या महामार्गाशी जोडण्याचा विचार सुरू आहे.

त्यामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी हा महामार्ग मोठ्या सुविधेचा ठरणार आहे. या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ९ मोठ्या पुलांचे बांधकाम होईल, ज्यासाठी ९ हजार १०५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

यातील काही पुलांचे कार्यादेश देण्यात आले असून, काही पुलांच्या कंत्राटांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्या तरी त्या लवकरच सोडवण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात रस्त्याच्या कामांसाठी १७ हजार ३५७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. राज्य सरकार आणि एमएसआरडीसीच्या माध्यमातून हा महामार्ग तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर कोकणातील दळणवळण व्यवस्था आधुनिक होईल आणि पर्यटन तसेच व्यापारासाठी नवे दार खुले होईल, असा विश्वास मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

नक्कीच हा महामार्ग प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण झाला तर कोकणातील विकासाला यामुळे मोठ्या प्रमाणात गती मिळणार असून कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe