Maharashtra New Highway : महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे नुकतेच संपन्न झाले. उपराजधानी पार पडलेल्या या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाकडून वेगवेगळ्या प्रकल्पांबाबत माहिती देण्यात आली.
दरम्यान आज आपण राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या अशाच एका मेगा प्रोजेक्ट बाबत माहिती पाहणार आहोत. हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने पायाभूत विकासाला नवी दिशा देणारा एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत अपडेट दिली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हिवाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या कनिष्ठ सभागृहात वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्ग कनेक्ट करणाऱ्या फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाबाबत माहिती दिली.
दादा भुसे यांनी पालघर जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या जागतिक दर्जाच्या वाढवण बंदराला थेट समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी फ्रेट कॉरिडॉर उभारण्यात येणार असून, या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार अशी माहिती सभागृहाला दिली.
मंत्री भुसे यांनी सांगितले की, वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पासाठी सुमारे 14 हजार कोटी रुपयांचा खर्च शासनाकडून केला जाणार आहे. महत्त्वाची बाब अशी की या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सुद्धा लवकरच रेडी होणार आहे.
या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवालचे (DPR) काम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे आणि लवकरच याचा आराखडा आता तयार होईल. हा महामार्ग सहा पदरी राहणार असून यावर 100 किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहने धावू शकतील अशी माहिती मंत्री महोदयांनी दिली.
या प्रकल्पामुळे पालघर ते समृद्धी महामार्गापर्यंतचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. सध्या चार ते पाच तास लागणारा हा प्रवास फक्त दीड तासांत पूर्ण होईल, असा दावा मंत्री भुसे यांनी केला आहे.
यामुळे वाहतूक खर्चात मोठी बचत होणार असून उद्योग आणि व्यापाराला चालना मिळणार आहे. हा मार्ग पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा तसेच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमार्गे इगतपुरी येथे समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे.
त्यामुळे राज्यातील मागास भाग समृद्धी महामार्गाला कनेक्ट होईल आणि या मागास भागाच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त होतोय. दरम्यान, डहाणूजवळ उभारण्यात येणाऱ्या वाढवण बंदर हे भारतातील सर्वात मोठे बंदर राहणार आहे.
भारतातीलच नाही तर आशिया खंडातील सर्वाधिक मोठे बंदर म्हणून याकडे पाहिले जात आहे आणि यासाठी जवळपास 76,220 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. या बंदरात नऊ अत्याधुनिक कंटेनर टर्मिनल असतील आणि त्याची वार्षिक क्षमता 298 दशलक्ष मेट्रिक टन इतकी राहणार अशी माहिती संबंधितांकडून प्राप्त झाली आहे.
या प्रकल्पामुळे सुमारे 12 लाख लोकांना थेट रोजगार मिळणार असून लाखो लोकांना अप्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. थोडक्यात हा प्रकल्प कोकण सहित संपूर्ण राज्याच्या विकासाला नवीन दिशा देणारा ठरणार आहे. यामुळे या बंदरासोबत राज्यातील अधिका-अधिक जिल्हे कनेक्ट करण्यासाठी हा फ्रेट कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आला आहे.













