Maharashtra New Railway Station : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. राज्यातील एका महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर तीन नवीन रेल्वे स्थानक तयार करण्यात येणार आहेत आणि यामुळे दोन महत्त्वाच्या महानगरांमधील प्रवास वेगवान होणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. या मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील अधिक असून या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून सातत्याने लोकल गाडीची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, आता नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील लाखो रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून एक अगदीच दिलासादायक आणि ऐतिहासिक ठरणारा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक ते मुंबई हा प्रवास गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांसाठी आव्हानातम्क राहिला आहे. या मार्गावर थेट लोकल आणि पुरेशा रेल्वे सेवांचा अभाव असल्याने या मार्गावर प्रवास करणे फारच कठीण आहे.
प्रचंड गर्दी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचा लहान स्थानकांवर थांबा नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना सुद्धा करावा लागत आहे. पण आता प्रवाशांच्या बऱ्याचशा अडचणी दूर होणार आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)पूर्वी उतरायचे असलेल्या प्रवाशांना कसारा, इगतपुरी किंवा जवळच्या स्थानकांवर उतरून पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागतोय.
या मार्गावरील अनेक स्थानकांवर गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांना या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाढत आहे. त्यामुळे नाशिक–कसारा लोकल सेवा सुरू करण्याची मागणी गेली अनेक दशके सातत्याने होत आहे.
या पार्श्वभूमीवर आता रेल्वे मंत्रालयाने मनमाड–कसारा आणि कसारा–मुंबई या सुमारे 131 किलोमीटर लांबीच्या मार्गावर दोन नवीन स्वतंत्र रेल्वे ट्रॅक टाकण्यास औपचारिक मान्यता दिली आहे.
खरंतर या प्रकल्पाची चर्चा केल्यानंतर दिवसांपासून सुरू होते आणि अखेर या प्रकल्पाला आता अधिकृत मंजुरी मिळाली आहे. हा निर्णय नाशिक–मुंबई लोकल सेवेच्या दिशेने रेल्वेने टाकलेले एक निर्णायक आणि अगदीच महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या नव्या ट्रॅकमुळे नाशिक ते कसारा, कसारा ते मुंबई तसेच भविष्यात थेट नाशिक ते मुंबई लोकल सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार असा विश्वास तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. कसारा घाट हा आतापर्यंत लोकल सेवेसाठी मोठा अडथळा मानला जात होता.
मात्र नव्या ट्रॅकमुळे या अडचणींवर मात होण्याची शक्यता आहे. यासोबतच पाडळी, वैतरणानगर आणि चिंचलेखरे ही नवीन स्थानके विकसित होण्याची अपेक्षा असून, त्यामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील प्रवाशांनाही मोठा लाभ होणार आहे.
कसारा–इगतपुरी विभागासाठी आवश्यक निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामागे खासदार राजाभाऊ वाझे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरला आहे.
त्यांनी केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे वारंवार निवेदने देत स्वतंत्र ट्रॅकची मागणी लावून धरली होती. या निर्णयामुळे सध्या प्रचंड वाहतूक असलेल्या मुंबई मार्गावरील ताण कमी होईल, तसेच एक्सप्रेस आणि मालगाड्यांचा वेगही वाढेल.
प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही आणि त्यांना योग्य मोबदला दिला जाईल, यावर खासदार वाझे यांनी भर दिला आहे.
एकूणच हा निर्णय नाशिक–मुंबई प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर करणारा ठरणार असून, उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला नवी चालना देणारा ठरेल.













