Maharashtra New Stadium : महाराष्ट्र राज्याने प्रत्येकच क्षेत्रात नेत्र दीपक कामगिरी केली आहे. क्रीडा क्षेत्रात देखील राज्यातील तरुणांनी अभूतपूर्व कामगिरी करत महाराष्ट्राचे नाव सातासमुद्रापार नेले आहे. क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राने अटकेपार झेंडा फडकवला आहे. यामुळे राज्यात विविध आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम तयार करण्यात आले आहेत.
यामध्ये मुंबईमधील वानखेडे स्टेडियमचा देखील समावेश होतो. अशातच आता राज्यात आणखी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम तयार होणार अशी बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे याची पायाभरणी देखील लवकरच केली जाणार आहे.
कुठे तयार होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा स्टेडियम
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील मुंबई नजीकच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा स्टेडियम तयार केले जाणार आहे. याची पायाभरणी उद्या अर्थातच दोन मार्चला होणार आहे. याची पायाभरणी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पूर्ण होणार आहे.
यामुळे बदलापूर शहरातील क्रीडा प्रेमींना ही खऱ्या अर्थाने एक मोठी भेट राहणार असा आशावाद व्यक्त होत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार शहरातील नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या जागेवर हे भव्य असे क्रीडा स्टेडियम विकसित होणार आहे.
नगर परिषद हद्दीतील विकास आराखडामधील, प्रभाग क्रमांक १८ सर्व्हे क्रमांक ५९ ही डीपीमध्ये आरक्षित असलेली ही जागा नगरपालिकेच्या ताब्यात असून याच जागेवर हे भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा स्टेडियम विकसित होणार आहे. त्यासाठी जवळपास पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर होणार आहे.
त्याची पायाभरणी शनिवारी अर्थातच दोन मार्च 2024 ला होणार आहे. यामुळे बदलापूर शहर, कर्जत, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तयार होणाऱ्या खेळाडूंना सरावासाठी मुंबईत जाण्याची गरज राहणार नाही.
या नव्याने विकसित होणाऱ्या स्टेडियमवर या खेळाडूंना सराव करता येईल आणि यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या भागात तयार होतील अशी आशा आहे. हे स्टेडियम 18 एकर जागेवर तयार होणार आहे.
स्टेडियमची आसन व्यवस्था ही वीस ते पंचवीस हजार लोकांची राहणार आहे. या ठिकाणी खेळाडूंसाठी ड्रेसिंग रूम, प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या गॅलरी, लॉबी, बसण्यासाठी आरामदायी आसन व्यवस्था, प्रसाधनगृह, खानपानाच्या सोयी, स्वच्छतागृह अशा विविध सुविधा विकसित केल्या जातील.
यामुळे खेळाडूंना प्रॅक्टिस करताना या स्टेडियमचा फायदा होणार आहे. तसेच येथे फुटबॉल, क्रिकेट इत्यादी खेळांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामने देखील होणार आहेत. यासाठी उत्तम दर्जाची खेळपट्टी तयार होणार आहे.
एकंदरीत या इंटरनॅशनल स्टेडियममुळे बदलापूर शहराला एक नवीन आणि वेगळे वैभव प्राप्त होणार आहे. स्टेडियममुळे बदलापूर शहराची ख्याती सातासमुद्रा पार जाणार आहे. शिवाय ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.