Maharashtra New Vande Bharat Express : महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतात वंदे भारत एक्सप्रेसची किती क्रेझ आहे हे वेगळे सांगायला नको. 2019 मध्ये प्रवाशांसाठी सुरू झालेल्या या गाडीने अल्पावधीतच प्रवाशांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या गाडीची लोकप्रियता आणि या गाडीतून होणारा सुरक्षित आणि जलद प्रवास प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करतोय.
यामुळे वाढीव तिकीट दर असतानाही प्रवासी या गाडीने प्रवास करण्यास पसंती दाखवतात. रेल्वे सुद्धा प्रवाशांच्या मागणीप्रमाणे देशभरातील महत्त्वाच्या शहरांमधून या गाडीचे संचालन करते. आतापर्यंत ही गाडी देशातील अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये सुरु झाली आहे.

तसेच येत्या काही दिवसांमध्ये या गाडीचे नेटवर्क आणखी स्ट्रॉंग होणार आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात सध्या बारा जोडी वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. विशेष म्हणजे राज्याला लवकरच आणखी एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याची खात्रीलायक बातमी एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या माध्यमातून समोर आली आहे.
ही गाडी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागांना कनेक्ट करणारी राहील. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ते मराठवाड्यातील नांदेड यादरम्यान ही गाडी सुरू करण्यात येणार असून यामुळे नांदेड ते पुणे हा प्रवास आणखी वेगवान होणार आहे.
नांदेड – पुणे हा 550 किलोमीटर लांबीचा प्रवास आहे या गाडीमुळे अवघ्या सात तासांवर येईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. खरे तर या गाडीच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत पण प्रत्यक्षात ही गाडी रुळावर कधी धावणार? हा सवाल आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना दरम्यान सुरू असणारी वंदे भारत ट्रेन थेट नांदेड पर्यंत विस्तारित करण्यात आली होती. तसेच आता पुणे ते नांदेड या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे.
म्हणजे मराठवाड्यातील नांदेड शहरासाठी ही दुसरी वंदे भारत ट्रेन असेल. नक्कीच यामुळे हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानकावरून ये-जा करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन डिसेंबर 2025 मध्ये किंवा जानेवारी 2026 मध्ये प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.
अद्याप या गाडीच्या उद्घाटनाची अधिकृत तारीख समोर आलेली नाही मात्र मीडिया रिपोर्ट मध्ये ही गाडी 2025 च्या शेवटी किंवा 2026 च्या सुरुवातीला रुळावर येणार असा अंदाज वर्तवला जातोय. या गाडीला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा झेंडा मिळाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यामुळे लवकरच ही गाडी रुळावर धावताना दिसणार आहे. तसेच या गाडीला लातूर, धाराशिव (उस्मानाबाद), कुर्डूवाडी, दौंड या महत्त्वाच्या स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहितीही देण्यात आली आहे. तसेच या गाडीचा तिकीट दर 1500 ते 1900 रुपये असू शकतो असा अंदाज आहे.













