महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार ६७ किलोमीटर लांबीचा नवा रिंग रोड ! पहिला टप्प्यासाठी ११६ कोटी रुपयांचे टेंडर

Maharashtra News : २०२५ आता अंतिम टप्प्यात आले आहे आणि लवकरच नव्या वर्षाला सुरुवात होईल. दरम्यान नवीन वर्ष सुरू होण्याआधी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्रमा मार्ग अर्थात रिंगरोडच्या कामाला गती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एमएसआयडीसी) ६६.१ किलोमीटर लांबीच्या नाशिक रिंगरोड प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात ११६ कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.

या टेंडरअंतर्गत एक किलोमीटर रस्त्याचे बांधकाम तसेच गोदावरी नदीवर दोन पूल उभारण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून नाशिक रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यातील ४८ किलोमीटर लांबीच्या मार्गाला मान्यता मिळाल्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळाली आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्थापनासाठी हा बाह्यवळण रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या ४ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत या रिंगरोडला मंजुरी देण्यात आली होती.

सिंहस्थपूर्वी हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने स्पष्ट केले आहे. रिंगरोडसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारली असून, त्यासाठी ३५६१.४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

बांधकामाचा संपूर्ण खर्च केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून करण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी अंदाजे ४२६२.६४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांना ८० टक्के मोबदला देऊन आधी जमीन ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर अंतिम दर निश्चित केला जाणार आहे.

एमएसआयडीसीने रिंगरोडचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी संपूर्ण प्रकल्प सात पॅकेजमध्ये विभागला आहे. पहिल्या पॅकेजमध्ये रिंगरोडच्या पूर्व बाजूला गोदावरी नदीवर दोन पूल आणि एक किलोमीटर रस्ता उभारण्याचा समावेश आहे.

हे पूल गोदावरी नदीवर असणार असल्याची माहिती एमएसआयडीसीचे कार्यकारी अभियंता इम्रान शेख यांनी दिली. भूसंपादन अद्याप पूर्ण झाले नसले तरी, ज्या ठिकाणी भूसंपादनाची आवश्यकता नाही, त्या ठिकाणी काम सुरू करून सरकार सिंहस्थपूर्वी रिंगरोड पूर्ण करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलत असल्याचे या टेंडरमधून स्पष्ट होत आहे.

हा रिंगरोड नाशिक शहराच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणार असून, भाविकांसह स्थानिक नागरिकांनाही मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.