Maharashtra News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनोत्तर पावसाने धुमाकूळ घातला आहे. यावर्षी राज्यात मान्सून पूर्व पाऊस देखील जोरदार झाला होता आणि आता मान्सूनोत्तर पाऊस देखील धुमाकूळ घालत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. मान्सूनच्या शेवटी आणि आता मान्सूनच्या एक्झिट नंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह पावसाची हजेरी लागत आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक पुन्हा एकदा संकटात सापडले आहे. आधी जो पाऊस झाला त्यात राज्यातील अनेक भागांमधील शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला.

यातून जे थोडेफार पीक वाचले होते ते पीक आता पुन्हा एकदा पावसाच्या आहारी जाणार असे चित्र तयार होत असून यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज अन उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मोंथा चक्रीवादळचा राज्याला फटका बसला होता. चक्रीवादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला होता. आता हे संकट निवळलय पण तरीही राज्याच्या हवामानात एक मोठा बदल पाहायला मिळतोय.
उत्तर छत्तीसगड परिसरात ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असल्याने पुन्हा एकदा राज्यावर पावसाचे ढग गडद झाले आहेत. आज पासून पुढील 2 दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.
कुठे पडणार पाऊस ?
31 ऑक्टोबर – आज विदर्भात पावसाचा अंदाज घेण्यात आला आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज IMD ने दिला आहे.
याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक आणि नंदूरबार तसेच कोकणातील रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
सोबत जालना, परभणी आणि हिंगोली या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असल्याचा अंदाज देण्यात आला आहे.
1 नोव्हेंबर – उद्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. सगळीकडेच पडणार नाही पण काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.













