Maharashtra News : आजपासून राज्यातील एक महत्त्वाचा घाट मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील सिंहगड घाटातील रस्ता काही कारणास्तव पुढील दोन-तीन दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
आज मध्यरात्रीपासून हा घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान याच सायकलिंग स्पर्धेच्या तयारीचा एक भाग म्हणून सिंहगड घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. सिंहगड घाट परिसरात सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामामुळे २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान सिंहगड घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश निघाले आहेत.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीचं हे आदेश जारी केले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्या संयुक्त अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर गोळेवाडी चौक ते सिंहगड घाट (कोंढणपूर बाजू) हा संपूर्ण मार्ग बंद राहणार आहे. तसेच या कालावधीत सिंहगड किल्ल्याकडे जाणारी पर्यटकांची वाहतूक पण पूर्णतः बंद ठेवली जाणार आहे.
शिवाय पानशेत, खानापूर, डोणजे आणि आतकरवाडी येथून सिंहगड घाटमार्गे खेड-शिवापूरकडे जाणारी वाहतूकही बंद राहील. यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. प्रशासनाने नागरिकांना वाहतूक बंदीचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा केले आहे.
सायकल स्पर्धकांची सुरक्षितता आणि रस्त्याच्या कामाची गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी ही तात्पुरती बंदी आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान आता आपण पर्यायी मार्ग कोणते आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत.
पर्यायी मार्ग कसे आहेत?
सिंहगड घाटातील वाहतूक पूर्णतः बंद राहणार असल्याने सर्वसामान्यांना डोणजे चौक → खडकवासला → किरकटवाडी → नांदेड सिटी → वडगाव धायरी मार्गे (एनएच-४८) हा मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या पर्यायी मार्गाचा वापर करून प्रवाशांना खेड-शिवापूरकडे जाता येणार आहे. हा घाट मार्ग 24 नोव्हेंबर मध्ये रात्रीपासून बंद होईल आणि 26 नोव्हेंबर रात्री बारा वाजेपर्यंत बंद राहणार आहे. पुढील 48 तासांच्या काळात सिंहगड घाट रस्त्यावर डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे.













