Maharashtra News : सर्वोच्च न्यायालयातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रश्न आता निकाली निघणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा आदेश दिला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका पार पाडण्याचा स्पष्ट आदेश दिला आहे.

यामुळे आता लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. जिल्हा परिषदा, महानगरपालिका, पंचायत समित्या अशा महत्त्वाच्या संस्थांच्या निवडणुका आता मुदतीत होणार आहेत.
याआधी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांबाबत महत्त्वाचा निकाल दिला होता. माननीय न्यायालयाने मे महिन्यात आपल्या निकालात येत्या चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते.
पण, तांत्रिक कारणांमुळे राज्य निवडणूक आयोगाला दिलेल्या मुदतीत निवडणुका घेता आल्या नाहीत. पावसाळा, प्रशासकीय कारणे आणि तांत्रिक अडचणींमुळे निवडणुका पार पडू शकल्या नाहीत.
खरेतर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. ओबीसी आरक्षणाशी संबंधित कायदेशीर प्रक्रियेमुळे 2022 पासून या निवडणुका सतत पुढे ढकलल्या जात आहेत.
त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज प्रशासकांच्या अखत्यारीत सुरू आहे. दरम्यान आजच्या सुनावणीत न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाच्या कारणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
निवडणूक आयोगाने EVM कमी आहेत, बोर्ड परीक्षा लागणार आहेत आणि आवश्यक कर्मचारी उपलब्ध नाहीत अशी कारणे मांडली होती. मात्र, न्यायालयाने बोर्ड परीक्षेचे कारण फेटाळून लावत, इतर दोन कारणांसाठी स्पष्ट सूचना दिल्यात.
न्यायालयाने प्रभाग रचना 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नोव्हेंबर महिन्यात EVMची पूर्तता झाली पाहिजे, असेही स्पष्ट केले आहे. या आदेशामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ग्रामीण ते शहरी पातळीवरील सत्तेच्या समीकरणांवर थेट परिणाम करणाऱ्या असल्याने आगामी चार महिन्यांत राजकीय पक्षांकडून तयारीला वेग येणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.