Maharashtra News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. दुसरीकडे अजूनही असंख्य कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत.
अशातच आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी तसेच पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय आहे

तसेच पश्चिम महाराष्ट्रातही कोकणातील अनेक जण पिकनिक साठी येतात. पश्चिम महाराष्ट्रातील महाबळेश्वरला अनेक जण भेटी देत असतात यामध्ये कोकणातील नागरिकांचा देखील समावेश आहे.
दरम्यान आता कोकणातील रत्नागिरी ते सातारा हा प्रवास वेगवान होणार आहे. यासाठी एक नवीन केबल स्टेट ब्रिज विकसित होणार असून यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील थेट कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या प्रकल्पाची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार प्रकल्प?
दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा या दोन जिल्ह्यांना जोडण्यासाठी नवीन केबल स्टेड ब्रिज विकसित होणार आहे. या नव्या ब्रिजमुळे रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वर पर्यंतचे अंतर 50 किलोमीटरने कमी होईल अशी माहिती समोर येत आहे.
यामुळे रत्नागिरीहून महाबळेश्वरला जलद गतीने जाता येणार आहे. म्हणून याचा या भागातील नागरिकांना आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे. या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर यासाठी जवळपास पावणेदोनशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
सुमारे 175 कोटी रुपयांचा खर्च करून विकसित होणारा हा मोठा पूल या वर्षाच्या अखेरीस सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकतो अशी सुद्धा माहिती हाती आली आहे. या प्रकल्पाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रातील पहिला वहिला केबल स्टेड प्रोजेक्ट राहणार आहे.
पर्यटनाला मिळणार चालना
महाबळेश्वर मधील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत 540 मीटर लांब व 14 मीटर रुंद असा पूल विकसित केला जात आहे. या पुलाच्या मध्यवर्ती भागात पर्यटकांसाठी एक व्ह्यू गॅलरी सुद्धा विकसित होणार आहे.
43 मीटर उंचीची ही व्ह्यू गॅलरी या प्रकल्पाचा एक प्रमुख आकर्षणाचा बिंदू राहणार आहे. तसेच, पर्यटकांना महाबळेश्वरचे नेत्र दीपक दृश्य आपल्या नजरेत कैद करता यावेत यासाठी आणि या गॅलरीत जाण्यासाठी कॅप्सूल लिफ्ट सुद्धा असणार आहेत.
तसेच दोन्ही बाजूंनी जिन्याचे मार्गही असणार अशी माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे. हा प्रकल्प महाबळेश्वर मधील पर्यटनाला नक्कीच चालना देणारा राहणार आहे आणि याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. या भव्य प्रकल्पाचे काम टी अँड टी कंपनीला देण्यात आले असून डिसेंबर 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.