Maharashtra News : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यात चीन आणि स्वित्झर्लंडपेक्षा मोठा काचेचा पुल तयार केला जाणार आहे. राज्यातील विदर्भ विभागात जगातील सर्वाधिक लांब काचेचा पूल तयार केला जाणार आहे. खरेतर, जगातील सर्वाधिक लांब काचेचा पुल महाराष्ट्रात पुणे हे आपल्या राज्यासाठी एक अभिमानास्पद बाब राहणार आहे.
विदर्भातील एका प्रसिद्ध पर्यटन स्थळावर हा काचेचा पुल तयार केला जाणार असल्याने ही राज्यातील पर्यटनाच्या नकाशावर सुवर्णाक्षरांनी कोरली जाणारी एक ऐतिहासिक घडामोड राहणार आहे. दरम्यान आता आपण हा जगातील सर्वाधिक लांब काचेचा पूल नेमका कुठे विकसित होणार? याबाबत माहिती पाहणार आहोत.

कुठं तयार होणार जगातील सर्वाधिक लांब काचेचा पूल
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे जगातील सर्वात लांब काचेचा स्कायवॉक उभारला जात असून, या भव्य प्रकल्पामुळे चीन आणि स्वित्झर्लंडमधील आतापर्यंतचे विक्रम मोडले जाणार आहेत.
“विदर्भाचे नंदनवन” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्याला या स्कायवॉकमुळे जागतिक पर्यटनाच्या पटलावर वेगळी ओळख मिळणार आहे. चिखलदरा येथे उभारण्यात येणारा हा स्कायवॉक तब्बल ४०७ मीटर लांबीचा असणार आहे.
त्यामुळे तो जगातील सर्वात लांब स्कायवॉक ठरेल. सध्या स्वित्झर्लंडमधील स्कायवॉक सुमारे ३९७ मीटर लांबीचा आहे, तर चीनमधील काचेचे पूल ३०७ ते ३६० मीटर दरम्यान आहेत. या पार्श्वभूमीवर चिखलदऱ्यातील स्कायवॉक जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकावर जाणार आहे.
विशेष म्हणजे हा आशिया आणि भारतातील पहिला पूर्णपणे काचेचा स्कायवॉक ठरणार आहे. हा स्कायवॉक मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात, चिखलदऱ्यातील गोराघाट पॉइंटपासून हरिकेन पॉइंटपर्यंत पसरलेला असेल. दोन्ही बाजूंनी खोल दऱ्या आणि सभोवतालचे हिरवेगार जंगल यामुळे या पुलावरून चालताना पर्यटकांना थरारक अनुभव मिळणार आहे.
पारदर्शक काचेमुळे खाली दिसणारी खोल दरी, धबधबे आणि नैसर्गिक सौंदर्य पाहताना अनेकांचे पाय थरथरतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकल्पामुळे चिखलदरा आणि संपूर्ण मेळघाट परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढेल, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि विदर्भाचा विकास वेगाने होईल. स्कायवॉक पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात एक नवा मान मिळेल, तर विदर्भाचे नैसर्गिक सौंदर्य जगभर पोहोचेल, यात शंका नाही.













