महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार समुद्रावरून जाणारा पहिला रोपवे ! पर्यटकांना अनुभवता येणार थरारक प्रवास

Published on -

Maharashtra Picnic : महाराष्ट्रातील विविध पिकनिक स्पॉटवर रोपवे विकसित केले जाणार असून यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे. दरम्यान याच रोप वे प्रकल्पाला आता नवी उंची मिळणार आहे.

कोकणातील प्रसिद्ध किल्ले आणि समुद्राच्या निसर्गरम्य ठिकाणी रोपवे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कोकणातील दोन किल्ल्यादरम्यान रोपवे प्रकल्प तयार होणार असून यामुळे पर्यटकांना थरारक प्रवास अनुभवता येणार आहे.

नक्कीच हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. गोवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला या दोन ऐतिहासिक ठिकाणांना जोडणारा हा रोप वे महाराष्ट्रातील पहिला समुद्रावरून जाणारा रोप वे ठरणार आहे.

हा प्रकल्प केवळ पर्यटनवाढीसाठी नाही तर कोकणातील अर्थव्यवस्थेलाही चालना देणारा ठरेल. स्थानिक रोजगार निर्मितीपासून ते पर्यटन व्यवसायाला मिळणारा नवा जोम, अशा अनेक बाबतीत हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे.

पर्यटकांना अद्वितीय असा हवेत झुलत समुद्रावरील प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने संयुक्तपणे निधी मंजूर केला आहे. केंद्रीय पर्वतमाला योजनेअंतर्गत या रोप वेसाठी मंजुरी मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड (एनएचएलएम) यांच्या सहकार्याने हा प्रकल्प साकारला जाणार आहे. स्थानिक पातळीवर या प्रकल्पासाठी मोठा पाठिंबा मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि पर्यटन व्यावसायिकांनी या संकल्पनेचे स्वागत केले आहे.

दापोलीतील सामाजिक कार्यकर्ते मिहीर दीपक महाजन यांनी या प्रकल्पासाठी सतत पाठपुरावा केला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या प्रकल्पाला गती देण्यासाठी विशेष लक्ष दिले होते.

दापोली आणि कोकणातील पर्यटनासाठी हा प्रकल्प एक नवा टप्पा असेल. इतिहास, निसर्ग आणि आधुनिक पर्यटन यांचा संगम घडवणारा हा रोप वे देशभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe