Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता बारा तासांचा प्रवास फक्त सात तासांवर येणार आहे. इतर एक्सप्रेस गाड्यांनी प्रवास करण्यासाठी लागणारा बारा तासांचा प्रवास कालावधी आता थेट सात तासापर्यंत कमी होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन महत्त्वपूर्ण भागातील नागरिकांसाठी एक नवीन हाय स्पीड ट्रेन सुरू केली जाणार आहे. नांदेड ते पुणे या मार्गावर लवकरच वंदे भारत एक्सप्रेस धावणार अशी बातमी समोर येत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या सेमी-हाय-स्पीड ट्रेन प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला असून, त्यासंबंधीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे.

नांदेड आणि पुणे दरम्यान सुमारे 550 किलोमीटरचा हा प्रवास सध्या बस किंवा इतर रस्ते मार्गाने 10 ते 12 तासांत पूर्ण होतो. मात्र, वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या सात तासांत पूर्ण होणार आहे. या मार्गावर ही नांदेडहून धावणारी दुसरी वंदे भारत एक्सप्रेस असेल.
ट्रेन डिसेंबर 2025 अथवा जानेवारी 2026 पर्यंत प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. या रेल्वेमुळे मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिवसह पुण्यात शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी ये-जा करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
सध्या मर्यादित रेल्वे सेवा असल्याने प्रवाशांना वेळखाऊ आणि खर्चिक प्रवास करावा लागतो. नवीन वंदे भारत एक्सप्रेस या प्रवासाला गती आणि आराम देईल. ही ट्रेन नांदेड, लातूर, धाराशिव, कुर्डूवाडी, दौंड आणि पुणे या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे.
आठवड्यातून पाच ते सहा दिवस ती धावेल, अशी शक्यता आहे. या मार्गावरील अंदाजित तिकीट दर एसी चेअर कारसाठी ₹1500 ते ₹1900 दरम्यान असू शकतो. रेल्वे प्रशासन लवकरच या ट्रेनच्या उद्घाटनाची अधिकृत तारीख आणि वेळापत्रक जाहीर करणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यातील अंतर केवळ प्रवासाच्या वेळेतच नव्हे, तर आर्थिक आणि सामाजिक संबंधांमध्येही कमी होईल. रोजगार, पर्यटन आणि व्यापार क्षेत्राला यामुळे मोठी चालना मिळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.













