Maharashtra Railway : भारतातील रेल्वेचे नेटवर्क हे फारच मोठे आहे. देशातील रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतीय रेल्वेने देशभरात जवळपास साडेसात हजार रेल्वे स्थानक विकसित केलेली आहेत.
देशातील जवळपास सर्वच भाग रेल्वेने कनेक्ट आहेत. विशेष म्हणजे रेल्वेचा प्रवास हा इतर प्रवासापेक्षा सर्वसामान्यांसाठी परवडणारा असतो. यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असेल तर रेल्वेने प्रवास करण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते.

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जेवणाची सुद्धा सुविधा दिली जाते. जेवणाची पाण्याची तसेच नाश्त्याची सुविधा रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना मिळते.
मात्र यासाठी प्रवाशांना अतिरिक्त चार्जेस द्यावे लागतात. सामान्यता सर्वच प्रकारच्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी जेवणाचे आणि नाश्त्याची सोय करून दिलेली असते मात्र यासाठी प्रवाशांना पैसे मोजावे लागतात.
पण महाराष्ट्रातून अशी एक एक्सप्रेस गाडी धावते ज्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत जेवणाची आणि नाश्त्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवाशांना मोफत जेवणाची सोय
महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील नांदेड ते पंजाब मधील अमृतसर दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवाशांना मोफत जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या एक्सप्रेस ट्रेन ला सचखंड एक्सप्रेस नावाने ओळखले जाते. ही गाडी नांदेड ते अमृतसर या दोन हजार किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर धावते आणि 39 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेत आहे.
नांदेडमधील श्री हजूर साहिब आणि अमृतसरमधील श्री हरमंदर साहिब गुरुद्वारा या दोन धार्मिक स्थळांना ही ट्रेन कनेक्ट करते आणि यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय आहे.
मात्र ही ट्रेन गेल्या 29 वर्षांपासून प्रवाशांना मोफत जेवणाचे सोय उपलब्ध करून देत आहे. ही अशी एकमेव एक्सप्रेस ट्रेन आहे ज्यातून प्रवास करताना प्रवाशांना जेवणासाठी एक रुपया सुद्धा खर्च करावा लागत नाही.
या ठिकाणी असते जेवणाची सोय
मिळालेल्या माहितीनुसार सचखंड एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष लंगरची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिल्ली, भोपाळ आणि मराठवाड्यातील परभणी, जालना,
छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी प्रवाशांसाठी विशेष लंगरची म्हणजे प्रसादाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जर स्वतः सोबत जेवणासाठी भांडी आणली तर त्यांना जेवण मोफत मिळते.
लंगर मध्ये प्रवाशांना दाल-खिचडी, छोले-भात, कढी-चावल, भाजी-भाकरी असे वेगवेगळ्या प्रकारचे जेवण दिले जाते. इथे दररोज जेवणाचा मेन्यू बदलत असतो. या ठिकाणी मिळणारे मोफत जेवण हे गुरुद्वाऱ्यामध्ये मिळणाऱ्या दानावर आधारित असते.
या जेवणाचे वाटप सेवाभावी लोकांच्या माध्यमातून केले जाते आणि प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळतो. ही ट्रेन महाराष्ट्रातील नांदेड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजी नगर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरून धावते.