Maharashtra Railway : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्याला एक नवीन रेल्वे मार्ग मिळणार असून या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी संबंधित गावांमध्ये जमिनीचे भूसंपादन देखील सुरू करण्यात आले आहे.
खरे तर गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग प्रकल्पाला आता गती देण्यात आली आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी धुळ्याच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी या प्रकल्पाच्या संदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण वाव यासाठी खासदार महोदयांनी रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्या आणि आता हाच पाठपुरावा यशस्वी होतोये. कारण की, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि नांदगाव या तालुक्यांमध्ये या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनासाठी आवश्यक ती कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या दोन्ही तालुक्यांमधील जवळपास 21 गावांमध्ये जमिनीच्या संपादनाची तयारी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत आता आपण मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील कोणत्या गावांमध्ये या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी जमिनीचे भूसंपादन सुरू झाले आहे? याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहेत डिटेल्स ?
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, या प्रकल्पासाठी भूसंपादन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. मध्य रेल्वेचे भुसावळ विभागातील उपमुख्य अभियंता (निर्माण) यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता या प्रकल्पासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती संपन्न झाली असल्याने आता लवकरच संबंधित गावांमध्ये प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होणार अशी माहिती जाणकारांकडून हाती आली आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यासाठी नाशिकचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कसा आहे प्रकल्प ?
या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणाऱ्या या प्रकल्पाचे मध्य प्रदेशातील काम जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचलेले आहे. आता महाराष्ट्रातील कामाला सुद्धा वेग येणार आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी महोदयांनी या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे भूसंपादन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत.
या गावांमध्ये होणार जमिनीचे भूसंपादन
इंदोर मनमाड रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी रेल्वे अधिनियम 1989 व 2008 च्या सुधारित तरतुदीनुसार भूसंपादन केले जाणार आहे. मनमाड ते नवीन धुळे आणि नरडाणा ते डॉ. आंबेडकर नगर दरम्यान एकूण 309.43 किमी लांबीच्या नवीन मार्गासाठी भूसंपादन करण्यात येणार अशी माहिती संबंधितांकडून हाती आली आहे.
या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी मालेगाव तालुक्यातील चोंढी, जळगाव, काळेवाडी, घोडेगाव चौकी, वर्हाणे, मेहुण, ज्वार्डी बु., येसगाव, सवंदगाव, सायणे बु., माल्हाणगाव, चिखलओहोळ, झोडगे या 15 गावांमध्ये जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे.
तसेच नांदगाव तालुक्यातील मनमाड, अस्तगाव, पांझणदेव, खाटगाव, नवसारी व भाडी या सहा गावांमध्ये जमिनीचे भूसंपादन होईल. म्हणजेच मालेगाव आणि नांदगाव या तालुक्यातील एकूण 21 गावांमध्ये या प्रकल्पासाठी जमिनीचे संपादन केले जाणार आहे.