Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे नेटवर्क आणखी विस्तारले जाणार आहे. राज्यात आता 3 नवे रेल्वे मार्ग विकसित होणार आहेत. मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक वेगवान करण्याच्या दिशेने मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रात तीन नवीन रेल्वे मार्ग विकसित केले जाणार असून या रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते पुणे दरम्यान चा प्रवास वेगवान व्हावा या अनुषंगाने अन लोणावळा घाटातील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवे रेल्वे मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
दरम्यान हे नवे रेल्वे मार्ग विकसित झाल्यानंतर प्रवास वेळेत मोठी कपात होणार असून, मेल-एक्सप्रेस गाड्या आता लोणावळा घाटात न जाता थेट पुण्याला धावणार आहेत. सध्या मुंबई-पुणे दरम्यान 192 किमी अंतर कापण्यासाठी 44 रेल्वेगाड्या धावतात, त्यातील 23 गाड्या दररोज धावणाऱ्या आहेत.
लोणावळा-खंडाळा घाट हा मार्गातील प्रमुख अडथळा असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव येथे मेल-एक्सप्रेस गाड्यांचा वेग ताशी 60 किमी इतकाच मर्यादित ठेवावा लागतो. तसेच, घाटातील चढ-उतारामुळे कर्जत स्थानकात बँकर (अतिरिक्त इंजिन) जोडण्याची आवश्यकता भासते.
यामुळे एकूण प्रवास वेळ वाढतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कर्जत ते तळेगाव, कर्जत ते कामशेत आणि कर्जत ते मळवली हे तीन नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत.
या मार्गांवर घाट नसल्याने गाड्या 110 किमी प्रतितास वेगाने धावू शकतील. सरळ मार्गामुळे बँकरची गरज भासणार नाही, तसेच गाड्यांचा वेग वाढल्यामुळे प्रवासात किमान एक तासाची बचत होईल.
रेल्वे बोर्डाकडे या प्रस्तावाची पाठवणी फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली असून, प्रकल्प मंजुरीनंतर चार वर्षांत काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. कर्जत ते तळेगाव मार्गासाठी 16 हजार कोटी आणि कर्जत ते कामशेत मार्गासाठी 10,200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई-पुणे प्रवास वेगवान होण्याबरोबरच जादा गाड्या चालविणेही शक्य होणार आहे. एकंदरीत हे तीन कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत या दोन रेल्वे मार्गांसाठी 26,200 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून या मार्गामुळे प्रवाशांना जलद प्रवासाचा अनुभव घेता येईल.