Maharashtra Railway News : रेल्वे कडून महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना एक मोठी भेट मिळाली आहे. खरे तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा ते शिर्डी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प 239.80 कोटी रुपयांचा आहे.
दुसरीकडे आता राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक विशेष गाडी सुरू केली जाणार आहे. ही विशेष गाडी विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणार आहे. विदर्भातील नागपूरहुन नाशिकपर्यंत रेल्वे कडून विशेष गाडी चालवली जाणार आहे.

महत्त्वाची बाब अशी की ही गाडी या मार्गावरील तब्बल 16 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. या गाडीला उत्तर महाराष्ट्रातील पाच महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. आता आपण याच विशेष गाडीचे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याचा आढावा घेणार आहोत.
कस असणार वेळापत्रक?
मध्य रेल्वे कडून नागपूर नाशिक एकेरी विशेष रेल्वे गाडी चालवली जाणार आहे. या एकेरी विशेष रेल्वे गाडीच्या एकूण दोन फेऱ्या होणार आहेत. मध्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार नागपुर नाशिक एकेरी विशेष रेल्वे गाडी 23 आणि 24 जुलै 2025 रोजी नागपूर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.
हे दोन दिवस ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावरून सायंकाळी साडेसात वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता ही गाडी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
या विशेष गाडीला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही गाडी खानदेशातील तीन महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर सुद्धा थांबा घेणार आहे. ही गाडी अनारक्षित राहणार आहे म्हणजेच ज्या प्रवाशांना ऐनवेळी प्रवास करायचा आहे अशा प्रवाशांसाठी ही गाडी अधिक फायद्याची ठरेल.
मध्य रेल्वेने म्हटल्याप्रमाणे या गाडीमध्ये एकूण 18 अनारक्षित कोच असतील, यातील 16 कोच सामान्य राहणार आहेत तर दोन गार्डसह लगेजची वाहतूक करणारे कोच असतील. नक्कीच या गाडीमुळे नागपूरहून नाशिकला जाणाऱ्या विदर्भवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार
सेंट्रल रेल्वेने म्हटल्याप्रमाणे नागपूर – नाशिक एकेरी विशेष रेल्वे गाडी या मार्गावरील विदर्भ विभागातील अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामनगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे.
तसेच ही गाडी उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या रेल्वे स्टेशनवर थांबेल. यामुळे या भागातील प्रवाशांना नक्कीच या गाडीचा चांगला फायदा होणार आहे. जे लोक अचानक प्रवासाला निघणार आहेत त्यांच्यासाठी ही गाडी अधिक लाभाची राहील.