Maharashtra Railway News : देशात नुकत्याच काही दिवसांपूर्वी होळीचा आणि धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला असून आता येत्या काही दिवसांनी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. यानंतर उन्हाळी सुट्ट्या सुरु होणार आहेत आणि याच उन्हाळी सुट्ट्यांच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्यात कि ते आपल्या मूळ गावाकडे निघतात. दरम्यान याचं उन्हाळी सुट्ट्यांच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून एप्रिल महिन्यात विशेष गाडी चालवले जाणार आहे.

उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनानं विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यात मुंबई सीएसएमटी – करमाळी स्पेशल (साप्ताहिक) या विशेष ट्रेनचा देखील समावेश करण्यात आला आहे.
ही गाडी एप्रिल महिन्यात चालवली जाणार असून आज आपण या स्पेशल एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार या संदर्भातही आता आपण माहिती पाहणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी ते करमाळी स्पेशल 10 एप्रिल ते 5 जुन या कालावधीत चालवली जाणार आहे. सीएसएमटी करमाळी विशेष ट्रेन ( गाडी क्रमांक 01151) मुंबई सीएसएमटीहून दर गुरुवारी 00:20 वाजता सुटेल आणि ट्रेन त्याच दिवशी दुपारी दीड वाजता करमाळीला पोहोचणार आहे.
गाडी क्रमांक 01152 करमाळी- मुंबई सीएसएमटी स्पेशल 10 एप्रिल ते 5 जून या काळात चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी दर गुरुवारी करमाळीहून दुपारी सव्वा वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 03:45 मिनिटांनी ही गाडी मुंबई येथील सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
ही गाडी कुठे थांबणार ?
या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबणार आहे.