Maharashtra Railway News : महाराष्ट्राला लवकरच आणखी एका नव्या रेल्वेमार्गाची भेट मिळणार आहे. एका महत्त्वाच्या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी शासनाकडून नुकताच निधी मंजूर करण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या महत्त्वाकांक्षी ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे.
या रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी ३,२९५.७४ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास मंगळवारी मंजुरी मिळाली आहे. यामुळे या प्रकल्पाचे काम आता फास्टट्रॅक मोडवर पूर्ण होणार अशी आशा आहे. दरम्यान सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारकडूनही प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

म्हणजेच महाराष्ट्र राज्य शासन या प्रकल्पासाठी १,६४७.८७ कोटी रुपयांचा आर्थिक वाटा उचलणार आहे अन राज्य शासनाकडून यास मान्यता सुद्धा देण्यात आली आहे. या निर्णयामुळे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले तुळजापूर शहर आता थेट रेल्वेच्या नकाशावर झळकणार आहे.
श्रीक्षेत्र तुळजापूर येथील आई तुळजाभवानीचे मंदिर हे जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख शक्तीपीठ आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातून तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
दरम्यान आता या नव्या रेल्वेमार्ग प्रकल्पाला मंजुरी मिळाली असल्याने भविष्यात तुळजापूर येथे येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. या प्रकल्पामुळे सोलापूर, तुळजापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांतील एकात्मिक विकासाला सुद्धा चालना मिळणार आहे.
हा मार्ग फक्त धार्मिक पर्यटनाला चालना देणारा ठरणार नाही तर यामुळे कृषी, शिक्षण, उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या फायदा पोहोचणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विकासाला सुद्धा चालना मिळणार आहे.
खरेतर राज्य शासनाने ग्रामीण भागातील एकात्मिक विकासाच्या अनुषंगाने रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्राच्या प्रकल्पांत ५० टक्के आर्थिक सहभागाचे धोरण स्वीकारलेले आहे. याच धोरणाच्या अनुषंगाने या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून निम्मा खर्च केला जाणार आहे.
याआधी १० फेब्रुवारी २०२३ रोजी सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वेमार्गाच्या ब्रॉडगेज कामासाठी ४५२.४६ कोटी रुपयांच्या आर्थिक सहभागास मान्यता देण्यात आली होती. मात्र, विविध कारणांमुळे प्रकल्पाचा खर्च वाढल्याने रेल्वे प्रशासनाने सुधारित अंदाजपत्रक सादर केले होते.
आता या सुधारित अंदाजपत्रकाला सुद्धा मान्यता मिळाली आहे आणि सुधारित अंदाजपत्रकानुसार निम्मा खर्च राज्य शासन करेल आणि यालाही राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाने हा सुधारित आराखडा मंजूर करून राज्याच्या वाट्याचा निधी टप्प्याटप्प्याने केंद्र सरकारला देण्यास मंजुरी दिली असल्याने प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयाचे विधान परिषदेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे. सरकारच्या निर्णयामुळे तुळजापूर-धाराशिव परिसराच्या विकासाचे नवे दालन खुले होईल.
धार्मिक पर्यटनासोबतच औद्योगिक आणि आर्थिक वाढीस चालना मिळेल, असा विश्वास सुद्धा आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर सोलापूरपासून धाराशिवपर्यंतचा रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.













