Maharashtra Railway News : मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावर एका नव्या स्थानकाची मागणी जोर धरत आहे. मध्य रेल्वे मार्गाच्या टिटवाळा आणि खडवली या स्थानकादरम्यान नवीन स्थानक विकसित करण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी आहे.
दरम्यान आता याच संदर्भात मध्य रेल्वे प्रशासनाकडून महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. या मार्गावर नवीन स्थानक विकसित होणार की नाही या संदर्भात मध्य रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

खरेतर, मध्य रेल्वेच्या टिटवाळा–खडवली दरम्यान नवीन गुरवली स्थानकाची मागणी पुन्हा एकदा धुळीस मिळाली आहे. ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केलेल्या या मागणीवर रेल्वे प्रशासनाने नकाराची भूमिका कायम ठेवत पत्राद्वारे त्यांना प्रशासनाचा निर्णय कळवला आहे.
या निर्णयामुळे १९६५ पासून स्थानकाच्या मागणीसाठी सातत्याने लढा देणाऱ्या ग्रामस्थांच्या आशांवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त होत आहे. मध्य रेल्वेचे उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक दीपक शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरवली स्थानक उभारून तेथे लोकल गाड्यांना थांबा दिल्यास विद्यमान वेळापत्रकावर मोठा परिणाम होईल.
नवीन थांबा वाढल्यास परिचालन वेळ वाढून काही गाड्या रद्द कराव्या लागू शकतात, अशी शक्यता रेल्वेने व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या चालू असलेल्या लोकल सेवेमध्ये विलंब, गाड्यांची गर्दी आणि साखळी विलंब वाढण्याची भीती रेल्वेने व्यक्त केली आहे.
देशमुख यांनी २८ सप्टेंबर आणि ६ ऑक्टोबर रोजी गुरवली स्थानकाची मागणी पुन्हा मांडत मध्य रेल्वेला पत्र पाठवले होते. मात्र या मागणीकडे पाहताना रेल्वेने आधीच नमूद केलेली तांत्रिक अडचण पुन्हा समोर आणली आहे.
वर्ष २०२२, २०२४ आणि नोव्हेंबर २०२४ मध्येही रेल्वेने अशाच कारणांमुळे नकार देत स्थानक शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे तांत्रिक कारणांचा आधार घेतच ही मागणी पुन्हा फेटाळल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानकाच्या नाकारलेल्या मागणीमुळे ग्रामस्थ आणि प्रवासी संघटनांमध्ये नाराजी आहे.
देशमुख यांनीही “रेल्वेच्या नकारात होकार दडलेला असतो” असे सांगत हार न मानण्याची भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, गुरवली स्थानकाची गरज केवळ ग्रामस्थांसाठी नव्हे तर दररोज हजारो प्रवाशांसाठी महत्त्वाची आहे.
स्थानक झाल्यास प्रवासात मोठी सुविधा मिळेल, गर्दी कमी होईल आणि अपघातांची शक्यता घटेल. प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे की गुरवली परिसराचा विकास वेगाने वाढत असून नेहमीपेक्षा अधिक प्रवासी या मार्गावर प्रवास करतात.
त्यामुळे या भागात स्थानक उभारणे ही काळाची गरज आहे. रेल्वेच्या नकारानंतरही ग्रामस्थ आणि प्रवासी संघटना याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा करण्यास तयार आहेत. रेल्वे प्रशासनाने तांत्रिक कारणे पुढे करून मागणी नाकारल्यानंतरही गुरवली स्थानकासाठीचा लढा आणखी उग्र होण्याची शक्यता आहे.













