राज्याला मिळणार १७४ किलोमीटर लांबीचा नवा रेल्वे मार्ग! ७,१०६ कोटी रुपयांच्या रेल्वे मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार….

Published on -

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी उत्तर महाराष्ट्र विभागातील जळगाव ते जालना असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. केंद्रातील सरकारने जळगाव-जालना रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

या १७४ किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्गाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता या प्रकल्पाच्या प्रत्यक्षात बांधकामाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जळगावात या प्रकल्पासाठीच्या हालचाली वाढल्या आहेत.

या प्रकल्पासाठी सरकारकडून ७,१०६ कोटी रुपयाचा खर्च केला जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सद्यस्थितीला या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, रेल्वे प्रशासनाने प्रत्यक्ष कामासाठी आवश्यक तयारी सुद्धा सुरू केली आहे.

जळगावमध्ये प्रत्यक्ष बांधकामासाठी प्रशासनिक हालचालींना गती देण्यात आली आहे. हा नवीन रेल्वे मार्ग खान्देश आणि मराठवाडा या दोन भागांमधील रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढवणारा गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे.

या प्रकल्पाचा बहुतांशी भाग हा मराठवाड्यातील आहे. या मार्गाचा सुमारे ७० टक्के भाग जालना जिल्ह्यातून आणि उर्वरित ३० टक्के भाग जळगाव जिल्ह्यातला आहे. या मार्गावरून प्रवासी तसेच मालवाहतूक गाड्यांची वाहतूक अधिक सोयीस्कर अन जलद होणार आहे.

विशेषतः जळगावमधून गुजरात व राजस्थानकडील प्रवास आणि दक्षिण भारताकडे जाणारी वाहतुक अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. या मार्गामुळे कृषी उद्योग शिक्षण पर्यटन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना फायदा होईल.

धार्मिक पर्यटनास यामुळे मोठी चालना मिळणार आहे. जालना जिल्ह्यातील राजूर येथील देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तसेच अजिंठा लेणींना भेट देणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना या नव्या रेल्वे मार्गाचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे.

याशिवाय, औद्योगिक गुंतवणूक वाढ, कृषी उत्पादनांच्या वाहतुकीची सुलभता आणि व्यापारवृद्धी यांना देखील या रेल्वेमार्गाचा थेट लाभ होईल असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे. खरेतर, या मार्गाचा प्रस्ताव पहिल्यांदा २००८ मध्ये समोर आला होता.

पण त्यावेळी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात रेट ऑफ रिटर्न नकारात्मक राहिला. म्हणजे या मार्गामुळे रेल्वे प्रशासनाला आर्थिक फायदा होणार नसल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आणि म्हणून प्रकल्प रखडला होता.

पण आता कालांतराने आर्थिक व्यवहार्यता अहवाल सकारात्म आला आणि रेल्वे प्रशासनाने ह्या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला. २०२२ मध्ये या प्रकल्पाची अधिकृत घोषणा झाली. तत्कालीन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या प्रकल्पासाठी विशेष पाठपुरावा केला.

रावसाहेब दानवे यांच्या पुढाकारामुळेच हा प्रकल्प मंजूर झाला. तसेच केंद्राकडून मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारने देखील आपल्या हिश्श्याचा ५० टक्के खर्च उचलण्याची तयारी दाखवली आणि आवश्यक तरतूद केली आहे.

या नव्या मार्गाच्या रूट बाबत बोलायचं झालं तर जळगाव-भुसावळ मार्गावरील भादली स्थानकापासून हा नवीन मार्ग सुरू होणार असून, त्यासाठी जळगाव-भादली दरम्यान नऊ किलोमीटरचा सहावा मार्ग तयार करण्यासाठी जमिनीचे सपाटीकरण सुद्धा सुरू करण्यात आले आहे. तसेच या प्रकल्पाचे भूसंपादन आता अंतिम टप्प्यात असून हे काम पूर्ण झाले की प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News