Maharashtra Railway : गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील रेल्वे नेटवर्क मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. अजूनही भारतीय रेल्वे कडून नवनवीन रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे आणि देशात आणखी काही नवीन रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत.
अशातच आता देशाची आर्थिक राजधानी मुंबई संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई शहरात नव्याने 12 रेल्वे मार्ग विकसित केले जाणार आहेत. केंद्रातील सरकारकडून 16241 कोटी रुपयांचा रेल्वे प्रकल्प मंजूर करण्यात आला असून या प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईत 12 नवे रेल्वे मार्ग विकसित होतील.

या नव्या प्रकल्पामुळे मुंबईतील कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार आहे. मुंबई लोकल मधील गर्दी यामुळे कमी होईल आणि मुंबईकरांना जलद गतीने प्रवास करता येईल अशी आशा आहे.
सध्या केंद्र विधिमंडळाचे म्हणजेच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सभागृहाला माहिती देताना असे सांगितले की रेल्वे मंत्रालयाने राजधानी मुंबईत 16,241 कोटी रुपयांचे 12 नवीन रेल्वे प्रकल्प मंजूर केले आहेत. दरम्यान आता आपण रेल्वे मंत्रालयाकडून मुंबईतील कोणते नवीन रेल्वे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत याची माहिती जाणून घेऊयात.
मुंबईतील हे रेल्वे प्रकल्प मंजूर
गोरेगाव – बोरिवली विस्तारित रेल्वे मार्ग : गोरेगाव बोरिवली पासून हार्बर लाइनचा विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 826 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प सात किलोमीटर लांबीचा राहील.
बोरिवली – विरार रेल्वे मार्ग : बोरिवली ते विरार दरम्यान पाचवी आणि सहावी लाईन विकसित करण्यात येणार आहे. यासाठी 2184 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे आणि हा प्रकल्प 26 किलोमीटरचा राहील.
विरार – डहाणू रोड रेल्वे : विरार ते डहाणू रोड दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गीका तयार करण्यात येणार आहे. 34 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी 3587 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
सीएसएमटी – कुर्ला रेल्वे : सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान 17.5 किलोमीटर लांबीच्या मार्गावर पाचवी आणि सहावी लाईन टाकली जाणार आहे. या प्रकल्पासाठी 891 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
मुंबई सेंट्रल – बोरिवली रेल्वे : 919 कोटी रुपयांचा खर्च करून रेल्वे कडून मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सहावी लाईन टाकली जाणार आहे.
यासोबतच, कल्याण ते बदलापूर दरम्यान 1510 कोटींचा खर्च करून तिसरी आणि चौथी मार्गीका टाकली जाईल. कल्याण ते कसारा दरम्यान 793 कोटी रुपयांचा खर्च करून तिसरी लाईन टाकली जाणार आहे.
नायगाव – जुईचंद्र दरम्यान डबल कॉर्ड लाईन टाकली जाईल आणि यासाठी 176 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निळजे ते कोपर दरम्यान 338 कोटी रुपयांचा खर्च करून डबल कॉर्ड लाईन टाकली जाणार आहे.