Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी नव वर्ष सुरू होण्याआधीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 2025 हे वर्ष आता अंतिम टप्प्यात आले आहे आणि येत्या काही दिवसांनी नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे.
दरम्यान 2026 सुरू होण्याआधीच देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आजपासून मुंबईतील दोन महत्त्वाचे रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी सुरू झाले आहेत.

बेलापूर नेरूळ उरण रेल्वे मार्गावरील दोन महत्त्वाची स्थानके आज 15 डिसेंबर 2025 पासून सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल झाली आहेत. सोबतच या मार्गावर पाच अतिरिक्त रेल्वे फेऱ्या देखील सुरू करण्यात आल्या आहेत.
रेल्वेच्या या निर्णयानंतर आता या मार्गावरील गाड्यांची संख्या 40 वरून 50 पर्यंत वाढली आहे आणि यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावरील लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी प्रवाशांच्या माध्यमातून उपस्थित केली जात होती. या मार्गावरील लोकलची संख्या वाढवण्यासाठी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पाठपुरावा करण्यात आला होता.
यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे या मार्गावर लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी अशी आगरी मागणी उपस्थित केली.
मुख्यमंत्र्यांच्या या मागणीवर आता रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून या मार्गावर आता अतिरिक्त पाच रेल्वे फेऱ्या सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. महत्वाची बाब म्हणजे आजपासून या अतिरिक्त फेऱ्या सुरू होणार आहेत.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मार्गावर पाच अतिरिक्त रेल्वे फेऱ्या सुरू करण्यास आणि दोन स्थानकांना मंजुरी देण्याचा मोठा निर्णय घेतला होता. दरम्यान रेल्वेमंत्र्यांच्या या निर्णयाची आज 15 डिसेंबर 2025 पासून अंमलबजावणी होणार आहे.
ही 2 स्थानके प्रवाशांच्या सेवेत दाखल
रेल्वे प्रवाशांच्या मागणीनुसार आता 15 डिसेंबर 2025 पासून हार्बर मार्गावर दोन नवीन स्थानकं सुरू होणार अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तारघर आणि गव्हाण ही दोन स्थानके आजपासून सुरू होणार आहेत.
यातील तारघर हे महत्त्वाचं स्थानक नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच आहे. या रेल्वे स्थानकासाठी रेल्वे प्रशासनाकडून जवळपास 100 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. हे या मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक ठरणार आहे आणि याचा लाखो प्रवाशांना फायदा होणार आहे.













