Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात ऐन हिवाळ्यात पावसाळ्यासारखा पाऊस सुरू झालाय. परवा कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये, काल सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात पावसाची नोंद करण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये पावसाची तीव्रता फारच अधिक पाहायला मिळाली.
यामुळे शेतकरी बांधव पुन्हा एकदा चिंतेत सापडले आहेत. बिगर मोसमी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेती पिकांचे पुन्हा नुकसान होईल की काय अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने आज पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे. काल हवामान खात्याने कोकण मध्ये महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली होती. आज सुद्धा असाच अंदाज देण्यात आला आहे.
काल अर्थातच 15 नोव्हेंबरला राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला होता मात्र आज 16 नोव्हेंबर रोजी राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे आज राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामानाची शक्यता आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता देखील आयएमडीने वर्तवली आहे.
पण राज्यातील काही भागात पावसाची आणि ढगाळ हवामानाची शक्यता असली तरी देखील आज महाराष्ट्राच्या उत्तर भागात अर्थातच उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव नासिक या जिल्ह्यांमध्ये थंडीचे तीव्रता कायम राहणार असा अंदाज आहे.
एकीकडे उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढत आहे तर दुसरीकडे आज राज्यातील कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, मराठवाडा विभागातील धाराशिव, लातूर या 6 जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच कोकणातील ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्र विभागातील अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, मराठवाडा विभागातील बीड, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मात्र या जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून कोणताच अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. अर्थातच या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.