Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने पुढील चार दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज जारी केला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच कोकणात पावसाची शक्यता आहे.
शनिवारी आणि रविवारी देखील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोण-कोणत्या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस ?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. अशीच परिस्थिती मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ही पाहायला मिळणार आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
याशिवाय आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावासाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
महत्त्वाची बाब अशी की, शनिवारी आणि रविवारी सुद्धा मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे.
तर इतर ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार असा अंदाज आयएमडीने जारी केला आहे. खरंतर दोन दिवसांपासून महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटची तीव्रता जाणवत आहे. ऑक्टोबर हिट मुळे सर्व नागरिक हैराण झाले आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमधील कमाल तापमान वाढले असून उकाड्यात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत जर राज्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली तर सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. वाढत्या उकाड्यामुळे त्रस्त नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.