Maharashtra Rain : गेले काही दिवस रखडलेल्या परतीच्या पावसाचा प्रवास आता पुन्हा एकदा सुरू झाला आहे. गत तीन-चार दिवसात राज्यात जोरदार परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अनुषंगाने या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
परतीच्या पावसाची शक्यता लक्षात घेता राज्यातील तब्बल 18 जिल्ह्यांना आज भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे राज्यातील कमाल तापमानात चढ-उतार होणार असा अंदाज आहे.
खरे तर ऑक्टोबरच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांमध्ये दिवसाचे कमाल तापमान वाढले होते. अनेक ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान हे 36 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते.
मात्र गत काही दिवसांमध्ये राज्यातील बहुतांशी भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली असल्याने कमाल तापमानात मोठ्या प्रमाणात घट नोंदवण्यात आली आहे. मात्र ज्या भागात पावसाची उघडीप आहे त्या ठिकाणी उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे.
दरम्यान आज पावसाला पोषक परिस्थिती तयार झाली आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे आज राज्यातील मध्य महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे.
या संबंधित जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
दुसरीकडे, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरसह, पुणे, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
या अनुषंगाने या संबंधित 18 जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी झाला आहे. यामुळे या सदर भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.