Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. खरंतर सप्टेंबर ची सुरुवात जोरदार पावसाने झाली. एक, दोन आणि तीन सप्टेंबरला राज्यातील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी पाहायला मिळाली. काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. मात्र चार तारखेनंतर पावसाने विश्रांती घेतली.
पुढे सात सप्टेंबरला म्हणजेच गणरायाच्या आगमनाच्या दिवशी पावसाला सुरुवात झाली. गणेश चतुर्थीच्या दिवशी सुरू झालेला पाऊस 10 सप्टेंबर पर्यंत कायम राहिला. मात्र तदनंतर पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. अशातच, कालं गणपती विसर्जनाचा सोहळा संपन्न झाला.
लाडक्या बाप्पाला निरोप देताना गणेश भक्तांचे चेहरे पडले होते. अशातच, आता भारतीय हवामान खात्याने अनंत चतुर्दशीनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल असा नवीन अंदाज जारी केला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गत सात-आठ दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर पूर्णपणे कमी झाला आहे. अगदीच तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळतोय. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती असल्याचा अंदाज दिला आहे.
आगामी पाच दिवस राज्यात ठीक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे. दुसरीकडे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 21 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिला आहे.
21 पासून सुरु होणारा हा पाऊस जवळपास 2 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार असे पंजाब रावांचे म्हणणे आहे. या काळात पावसाची तीव्रता फारच अधिक राहणार असा अंदाज आहे. पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे 21 सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील विदर्भा कडून पावसाला सुरुवात होणार आहे.
सुरुवातीला पूर्व विदर्भ नंतर मग पश्चिम विदर्भ त्यानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मग तसाच पाऊस पुढे कोकणात जाईल असे पंजाबरावांचे म्हणणे आहे. या काळात अगदीच ओढे नाले भरून वाहतील असा जबरदस्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होणार अशी भीती व्यक्त होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी 21 सप्टेंबर पर्यंत खरीप हंगामातील जी पिके हार्वेस्टिंग साठी रेडी झाली असतील त्यांची काढणी करून घ्यावी असा सल्ला दिला जात आहे.