Maharashtra Rain : गणरायाच्या आगमनाच्या दिवशी महाराष्ट्रात पाऊस सक्रिय झाला होता. गणेश चतुर्थी पासून अर्थातच सात सप्टेंबर पासून ते 10 सप्टेंबर पर्यंत राज्यात चांगला पाऊस झाला. यानंतर पावसाने विश्रांती घेतली. परंतु अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच गणरायाच्या विसर्जनाच्या दिवशी महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली.
पावसाचे प्रमाण फारच कमी राहिले मात्र तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी पाहायला मिळाली. गणरायाच्या आगमनाप्रमाणेच गणरायाच्या विसर्जनाच्या दिवशीही पावसाचे आगमन झाले. मात्र, यंदा गणेशोत्सवावर पावसाचे फारसे सावट पाहायला मिळाले नाही.

पाऊस पडला पण पावसाचे प्रमाण फारच कमी राहिले. त्यामुळे संपूर्ण गणेशोत्सव आनंदात साजरा झाला. गणेशोत्सवावर पावसाचे विरजण पडले नाही. अशातच आता भारतीय हवामान खात्याने पावसा संदर्भात एक नवीन अपडेट दिली आहे. हवामान खात्याने राज्यातील पावसाचा जोर वाढणार असे म्हटले आहे.
या तारखेपासून सुरू होणार मुसळधार पाऊस
आज 19 सप्टेंबरला महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अगदीच हलक्या पावसाची शक्यता आहे. आज राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पावसाची विश्रांती राहणार आहे. मात्र उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
20 सप्टेंबर पासून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढेल असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे. राज्यात शुक्रवारी आणि शनिवारी बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार पाऊस
उद्या अर्थात शुक्रवारी राज्यातील खानदेशातील जळगाव मराठवाडा विभागातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने या संबंधित विभागातील जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे या विभागातील इतर जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. शनिवारी मात्र पावसाचे प्रमाण आणखी वाढणार आहे. शनिवारी विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या अनुषंगाने या संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट सुद्धा मिळालेला आहे. एवढेच नाही तर या दिवशी उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि छत्रपती संभाजी नगर वगळता मराठवाड्यातील उर्वरित 7 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.













