Maharashtra Rain : दिवाळीमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने दणका दिला. दिवाळीच्या काळात झालेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे थंडीला ही उशिराने सुरुवात झाली. मात्र आता राज्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट आली असून कडाक्याच्या थंडीने नागरिकांना हूडहुडी भरत आहे.
राज्यातील उत्तर महाराष्ट्र विभागात थंडीचे प्रमाण हे इतर विभागांच्या तुलनेत अधिक जाणवत आहे. थंडीचा जोर वाढला असल्याने आता रब्बी हंगामातील पिकांना देखील पोषक परिस्थिती तयार होत असून वाडीच्या अवस्थेत असलेल्या पिकांमधून चांगले उत्पादन मिळणार अशी अशा शेतकऱ्यांना आहे.
मात्र अशातच राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे राज्यात 27 नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा पावसाळी वातावरण तयार होणार आहे.
27 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या काळात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्रता कमी होईल असा अंदाज आहे.
भारतीय हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा, पंजाब आणि राजस्थान दरम्यान हवेच्या उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राकडे येणाऱ्या थंड कोरड्या वाऱ्याचा परिणाम म्हणून थंडीत वाढ होत आहे.
अनेक ठिकाणी कमाल आणि किमान तापमान मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. पण, २७ नोव्हेंबरपासून राज्यातील कडाक्याच्या थंडीला ब्रेक लागणार आहे.
कारण म्हणजे २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्रातील सोलापूर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह मराठवाडा विभागातील धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार अशी परिस्थिती आहे.
तसेच या काळात काही ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. मात्र या तीन-चार दिवसांच्या पावसाळी वातावरणानंतर पुन्हा एकदा राज्यात थंडीची तीव्रता वाढणार आहे. ३० नोव्हेंबरनंतर पुन्हा एकदा थंडीला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.