Maharashtra SCERT Exam News : राज्यातील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पहिले ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा कालावधी पुढे ढकलण्याचे नेमके कारण काय याच संदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या सूचनेला उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली आहे.
ते म्हणालेत की, शालेय शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने शालेय परीक्षांचा कालावधी पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या सूचनेला उत्तर देताना दादा भुसे यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

मंत्री महोदयांनी यावेळी हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. खरेतर, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा आणि संकलित मूल्यमापन चाचण्यांचे आयोजन एकाच वेळी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परीक्षेचे वेळापत्रक ठरवून त्यानुसार परीक्षा 8 ते 25 एप्रिलदरम्यान घेतल्या जाणार आहेत. दरम्यान या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक प्रभावी होईल आणि ते मुख्य प्रवाहात राहतील, असा दावा सरकारकडून केला जातोय.
याच संदर्भात विधान परिषदेत बोलताना भुसे यांनी इयत्ता पहिली ते पाचवीसाठी शाळा वर्षभरात दोनशे दिवस सुरू राहणे आवश्यक आहे, तर सहावी आणि त्यापुढील वर्गांसाठी 220 दिवस सुरु राहणे आवश्यक असल्याचे सांगितले अन हीच गोष्ट विचारात घेऊन हा कालावधी ठरवण्यात आला असल्याचेही स्पष्ट केले.
पुढे बोलताना त्यांनी असे म्हटले की, पूर्वी परीक्षा लवकर घेतल्याने अनेक विद्यार्थी परीक्षा झाल्यानंतर शाळेत येणे टाळत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असे. यामुळे परीक्षा सकाळी आठ ते साडेदहा या वेळेत घेण्याचा निर्णय झाला आहे.
यामुळे शिक्षक त्याच दिवशी उत्तरपत्रिका तपासू शकतील, यामुळे निकाल प्रक्रियाही जलद होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातील सर्व शाळांमध्ये एकाचवेळी परीक्षा आयोजित करण्याची सूचना एससीईआरटीने केली असून, त्यानुसार वेळापत्रक ठरवले गेले आहे.
नववीच्या परीक्षा 8 एप्रिलपासून सुरू होतील, तर संकलित मूल्यमापन चाचणी 19 एप्रिलपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. आठवीसाठी 11 एप्रिलपर्यंत संकलित मूल्यमापन चाचणी आणि 19 ते 25 एप्रिलदरम्यान वार्षिक परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
सहावी व सातवीच्या वर्गाबाबत बोलायचं झालं तर या दोन्ही वर्गांच्या परीक्षा 19 ते 25 एप्रिलदरम्यान होणार आहेत. तसेच पाचवीच्या परीक्षा 9 ते 19 एप्रिलदरम्यान होणार आहेत अन वार्षिक परीक्षा 21 ते 25 एप्रिल दरम्यान होतील. तिसरी व चौथीच्या परीक्षा 22 ते 25 एप्रिल, पहिली व दुसरीच्या 23 ते 25 एप्रिल दरम्यान घेतल्या जाणार आहेत.
यामध्ये संकलित मूल्यमापन चाचणी मराठी, इंग्रजी आणि गणित या विषयांसाठी घेतली जाणार आहे. राज्य सरकार या चाचणीसाठी प्रश्नपत्रिका पुरवणार असून, पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षांचे नियोजन मात्र शाळांना स्वतःच करावे लागणार असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले आहे.