Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागाने राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
शिक्षण विभागाने शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारात सुसूत्रता आणण्यासाठी नवे पाऊल उचलले आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार आता राज्यातील सर्व सरकारी तसेच अनुदानित शाळांनी संचमान्यतेनुसार मंजूर पदांची मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शिक्षण विभागाने पहिल्यांदाच घेतला हा निर्णय
आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्यातील शिक्षण विभागाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पदांचे मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयानुसार राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांतील लाखो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांचे प्रथमच मॅपिंग होणार आहे.
म्हणजेच याआधी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांचे मॅपिंग काही झालेले नाही. त्यामुळे सध्या शिक्षण विभागाच्या या निर्णयाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच या निर्णयानंतर शिक्षण विभागात एकच खळबळ माजली आहे.
अन्यथा वेतन थांबवले जाणार !
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांचे मॅपिंग करण्यासाठीच्या या प्रक्रियेसाठी एनआयसीच्या ‘एपीआय’चा वापर करून शालार्थ प्रणाली अद्ययावत केली जाणार आहे. संचमान्यतेतील उच्चतम मंजूर पदेच या प्रणालीत स्वीकारली जाणार असून, प्रणालीत नोंद नसलेल्या शिक्षकांचे वेतन रोखले जाईल अशी माहिती देखील यावेळी समोर आली आहे.
यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. महत्त्वाची बाब अशी की शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांनी मे महिन्यात ही माहिती भरायची आहे आणि जूनपासून शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन नव्या प्रणालीद्वार वर्ग केले जाणार आहे.
या निर्णयामुळे बोगस शिक्षक, मंजूर नसलेली पदे व संस्थाचालकांची मनमानी थांबणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉक्टर श्रीराम पानझडे यांनी राज्यात प्रथमच अशा स्वरूपात पदांचे केंद्रीत मॅपिंग होणार अशी माहिती दिली आहे. तसेच यामुळे वेतन, मंजूर पदे आणि शिक्षकांची संख्येतील ताळमेळ राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.