Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावीचा निकाल जाहीर केलाये. 13 मे 2025 रोजी राज्य बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. खरे तर दरवर्षी दहावीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जात असे आणि बारावीचा निकाल हा जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात लागत असे.
यंदा मात्र दहावी आणि बारावीच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षा वेळेच्या आधी झाल्यात आणि यामुळे निकाल सुद्धा वेळेच्या आधीच लागणार असे वाटत होते.

तसेच, यावर्षी शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार सुद्धा घातला नाही यामुळे निकाल वेळेच्या आधीच जाहीर होणार असे राज्य बोर्डाचे अध्यक्षंकडून निकाल जाहीर होण्याआधीच स्पष्ट करण्यात आले होते आणि यानुसार 15 मे 2025 च्या आधीच दोन्ही वर्गांचे निकाल जाहीर करण्यात आलेत.
दरम्यान आता दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी पुढील वर्गातील प्रवेशासाठी लगबग करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
खरे तर दहावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ करत आहेत. अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा प्रथमच ऑनलाइन करण्यात आली असून ही प्रक्रिया सुरू सुद्धा झाली आहे.
अकरावीला ऍडमिशन घेण्यासाठी मात्र विद्यार्थ्यांना दहावीची गुणपत्रिका आवश्यक आहे आणि याच गुणपत्रिकेच्याबाबत आता बोर्डाकडून मोठी माहिती देण्यात आली आहे.
दहावीच्या गुणपत्रिकेबाबत समोर आली मोठी अपडेट
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या पाच दिवसांनी अर्थातच 26 मे 2025 रोजी विद्यार्थ्यांना शाळांच्या माध्यमातून दहावीचे गुणपत्रक वाटप केले जाणार आहे. दरवर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप माध्यमिक शाळांमार्फत केले जाते. यंदा या गुणपत्रिकांचे वाटप 26 मे रोजी होणार आहे.
खरेतर, 10वी च्या परीक्षेच्या गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेखाचे वाटप हे विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना केले जाईल, सोमवारी सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे.
त्यानंतर मग माध्यमिक शाळांमार्फत दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप केले जाईल अशी माहिती संबंधितांकडून समोर आली आहे.