Maharashtra Schools : नवीन वर्ष सुरू होण्यास आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. दरम्यान नवीन वर्ष सुरू झाले की लगेचच दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेची लगबग देखील सुरू होणार आहे.
खरे तर महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमातून आधीच दहावीचे आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार 23 जानेवारी 2025 पासून इयत्ता बारावी वर्गाच्या बोर्ड परीक्षा सुरू होणार आहेत.

यामुळे विद्यार्थी सध्या अभ्यासात गुंतलेले आहेत. एकंदरीत दहावी-बारावीच्या परीक्षा आता जवळ आल्या आहेत आणि त्याचं आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आता राज्य बोर्डाकडून महत्त्वाचा निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. दहावी-बारावीची परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त करण्यासाठी राज्य मंडळाने कडक तयारी सुरू केली आहे.
परीक्षेच्या आधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षांदरम्यान कुठल्याही प्रकारची गैरप्रकार, गोंधळ किंवा कॉपी प्रकरणे होऊ नयेत, यासाठी सर्वंकष नियोजन केले असल्याची माहिती समोर आली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रामाणिकता जपण्यासाठी आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी अनेक कठोर उपाययोजना अमलात आणल्या जात आहेत.
या नव्या उपाययोजनानुसार आता राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांना आता वॉल कंपाउंड असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या केंद्रांवर कंपाउंड भिंत नव्हती किंवा ती तुटलेली होती, तेथे तातडीने भिंत उभारण्याचे किंवा पर्यायाने तारेचे कुंपण करण्याचे निर्देश देण्यात आले असून अनेक ठिकाणी त्याचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. यासोबतच प्रत्येक परीक्षा कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्यपणे बसविण्यात आले आहेत.
ज्या केंद्रांवर हे कॅमेरे उपलब्ध नव्हते, तिथे नवीन कॅमेरे बसवण्याचे आदेश आधीच देण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षी प्रथमच एक महत्त्वाची आणि नव्या तंत्रज्ञानावर आधारित पावले उचलण्यात आली आहेत. प्रत्येक पर्यवेक्षकाचा मोबाईल फोन जिल्हा नियंत्रण कक्षाशी जोडला जाणार असून झूम अॅपच्या माध्यमातून प्रत्यक्ष वेळेत परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवले जाणार आहे.
त्यामुळे परीक्षेदरम्यान घडणारी प्रत्येक घडी नियंत्रण कक्षाच्या नजरेत राहणार आहे. तसेच पर्यवेक्षकांचेही मोबाईल कॅमेरे सतत सुरु ठेवण्याचे बंधन असणार आहे. बारावीच्या परीक्षा 23 जानेवारीपासून सुरू होणार असल्याने त्याआधी सर्व केंद्रांची गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली आहे.
याशिवाय शहरातील पर्यवेक्षकांना ग्रामीण भागात आणि ग्रामीण भागातील पर्यवेक्षकांना शहरातील किंवा इतर केंद्रांवर नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओळखीच्या शिक्षकांचा परीक्षेवर परिणाम होऊ नये, विद्यार्थ्यांवर काटेकोर लक्ष ठेवता यावे आणि पारदर्शकता वाढावी, हा या निर्णयामागचा हेतू आहे.
राज्य शिक्षण मंडळ, जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी या संपूर्ण प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवणार असून, यंदाची बोर्ड परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त आणि निर्भेळ पार पाडण्याचा निर्धार यंत्रणेने व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांनी नियमानुसार परीक्षा द्यावी आणि पालक व शाळांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.