Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महाराष्ट्र राज्य महानगरपालिका व नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघाने महाराष्ट्रात शाळा बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे. खरेतर, TET बाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी महत्त्वाचा निर्णय दिला.
सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर रोजी टी ई टी बाबत निकाल देतांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) बंधनकारक असल्याचे जाहीर केले. दरम्यान या सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य महानगरपालिका व नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ यांनी तीव्र भूमिका घेतली आहे.

राज्य शासनाने या निर्णयाविरोधात तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी संघटनेची गेल्या काही दिवसांपासूनची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी संघटना जोरदार पाठपुरावा सुद्धा करत आहे. दरम्यान या संघटनेने राज्य शासनाला दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.
दोन आठवड्याच्या आत राज्य शासनाने योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा 24 नोव्हेंबर रोजी राज्यभर शाळा बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. यामुळे दोन आठवड्यात राज्य शासन नेमका काय निर्णय घेणार? संघटनेच्या या इशाऱ्याला गांभीर्याने घेणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
तसेच जर राज्य शासनाने येत्या दोन आठवड्यात योग्य ती कारवाई केली नाही तर खरंच 24 नोव्हेंबरला शाळा बंद राहणार का ? हे सुद्धा पाहणे उत्सुकतेचे राहील. दरम्यान संघटनेने नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित केली होती.
मंगळवारी पुण्यातील रावसाहेब पटवर्धन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे घेण्यात आलेल्या याच पत्रकार परिषदेत संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सचिन डिंबळे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करून राज्य सरकार शिक्षकांना लक्ष्य करत आहे.
अनेक शिक्षकांवर अन्यायकारक कारवाया होत आहेत. टीईटी नसल्यामुळे अनुभवी शिक्षकांच्या नोकरीवर धोका निर्माण झाला असून त्याचा परिणाम शिक्षकांच्या मनोधैर्यावर होत असल्याचे सांगितले. दरम्यान याचं पार्श्वभूमीवर संघटनेने राज्य शासनाला दोन आठवड्यांचा अवधी देत तातडीने कार्यवाही करण्याचा अल्टिमेटम दिला आहे.
“जर शासनाने या कालावधीत पुनर्विचार याचिका दाखल केली नाही, तर २४ नोव्हेंबर रोजी राज्यभर शाळा बंद आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा यावेळी संघटने कडून देण्यात आला.
संघटनेने असे स्पष्ट केले की आंदोलन हा आमचा अंतिम पर्याय नाही, मात्र शिक्षकांवर होत असलेला अन्याय थांबला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. संघटनेने अनुभवी शिक्षकांना सेवा-सुविधांचे संरक्षण मिळावे आणि त्यांच्या नोकरीवर गदा येऊ नये, अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.













