राज्यातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी ! शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Published on -

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्यातील इयत्ता 5 वी आणि 8 वीतील विद्यार्थ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की या दोन वर्गासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी जाहीर केले की 8 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता 22 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी होणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपल्या अभ्यासाचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे आवाहनही परिषदेने केले आहे.

या बदलामागे महत्त्वाचे कारण म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी). केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तर्फे आयोजित सीटीईटी परीक्षा देखील 8 फेब्रुवारीलाच ठेवण्यात आली होती.

राज्यातील मोठ्या संख्येने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक या परीक्षेला बसणार असल्याने त्यांच्याकडून शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी सातत्याने होत होती. शिक्षकांनी उपस्थित राहू न शकल्यास शाळांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या कामकाजात तुटवडा भासला असता.

ही परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षा परिषदेने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत परीक्षेची नवीन तारीख निश्चित केली. परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी सांगितले की, “शिष्यवृत्ती परीक्षा लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

त्यामुळे सर्व शाळांनी, परीक्षा केंद्रांनी आणि पालकांनी नवीन तारखेची तत्काळ नोंद घ्यावी.” याबरोबरच संबंधित सर्व यंत्रणांना आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

शिष्यवृत्ती परीक्षा ही मूलत: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेचे परीक्षण करणारी स्पर्धा असून राज्यातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे.

इयत्ता 5 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेच्या आधारे पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे मागे राहणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाची उत्तम संधी उपलब्ध होते.

नवीन तारखेमुळे अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासाची अधिक तयारी करण्याची संधी मिळेल, तर शिक्षक व परीक्षा केंद्रांनाही सुरळीत आयोजनाची मुभा मिळेल. परीक्षेच्या पुढील कार्यवाही, प्रवेशपत्रे आणि इतर सूचना वेळोवेळी परिषद प्रसिद्ध करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News