Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरंतर विद्यार्थ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. सरकार विद्यार्थ्यांसाठी काही शिष्यवृत्ती योजना देखील राबवते.
आज आपण केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या अशाच एका महत्त्वपूर्ण शिष्यवृत्ती योजनेची माहिती पाहणार आहोत. केंद्र सरकार देशभरातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्ती योजना राबवत आहे.

ही योजना केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयामार्फत राबविण्यात येते. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्ती योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी ठरत आहे.
या योजनेंतर्गत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारकडून दर महिन्याला 1000 रुपये शिष्यवृत्ती मिळते.
म्हणजेच बारा महिन्यात बारा हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळते. महाराष्ट्रात सुद्धा केंद्र सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आपल्या राज्यात 21 डिसेंबरला परीक्षा होणार आहे.
तसेच या परीक्षेचा निकाल पुढल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जाहीर होणार आहे. या योजनेचा उद्देश गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे.
परीक्षेत उत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा 1,000 रुपये शिष्यवृत्ती मिळते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नववीपासून बारावीपर्यंत पैसे मिळतात. पण या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वैयक्तिक अर्ज करावा लागत नाही.
अर्ज प्रक्रिया थेट शाळांमार्फत केली जाते. विद्यार्थ्यांनी स्वतः अर्ज करायचा नसून शाळाच त्यांच्यावतीने आवश्यक कागदपत्रे सादर करते. अर्जदार हा राज्य सरकार, सरकारी अनुदानित किंवा स्थानिक संस्थांच्या शाळेत शिकत असणे आवश्यक आहे.
सातवीच्या परीक्षेत किमान 55 टक्के गुण असणारा विद्यार्थी यासाठी पात्र असतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के गुण मिळाले असले तरी ते पात्र ठरतात. शिष्यवृत्ती मिळण्यासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी असावे.
विद्यार्थ्यांना ही परीक्षा मराठी भाषेत सुद्धा देता येते. एनएमएमएस ही योजना अनेक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीचा पाया ठरत असून, दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना तिचा लाभ मिळतो. 2025-26 या शैक्षणिक वर्षातील परीक्षा विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.