Maharashtra Schools : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अन अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी लालपरी अर्थात एसटी बस जीवनवाहिनी ठरली आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाकडून राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने शाळेतील तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे दरवर्षी दिवाळी झाली की शैक्षणिक सहलींचा सिझन सुरू होतो. प्रत्येक शाळा – कॉलेज एक दिवसीय किंवा मग दोन-तीन दिवसीय सहलीचे आयोजन करतात.
यंदाही राज्यभरातील शाळा तसेच कॉलेजेस आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन शैक्षणिक सहलीला जाणार आहेत आणि याच शैक्षणिक सहलीला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता परिवहन विभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
तिकीट दरात मिळणार 50 टक्के सवलत
यंदा शैक्षणिक सहलींसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षी महामंडळाकडून तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. एवढेच नाही तर शैक्षणिक सहलीसाठी बसेस कमी पडू नयेत याची पण काळजी महामंडळ घेणार आहे.
यावर्षी मोठ्या प्रमाणात नव्या बसेस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे शैक्षणिक सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महामंडळाने 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला असल्याने यावर्षी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक सहलींना चांगला प्रतिसाद सुद्धा मिळेल आणि यंदा सर्वच शाळा शैक्षणिक सहल काढणार असे बोलले जात आहे.
दिवाळी सुट्टीनंतर राज्यभरातील विद्यार्थी ज्या गोष्टीची उत्साहाने वाट पाहतात ती गोष्ट म्हणजे शैक्षणिक सहल. आता याचं पार्श्वभूमीवर सुरक्षित, परवडणारा आणि सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील 251 डेपो दररोज 800 ते 1000 नव्या बस शाळा व कॉलेजांसाठी उपलब्ध करुन देतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुकर आणि सुरक्षित होईल. मागील वर्षी नोव्हेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत एमएसआरटीसीने शैक्षणिक सहलींसाठी 19,624 बस उपलब्ध करून दिल्या होत्या.
यामुळे महामंडळाला तब्बल 92 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. ही कामगिरी पाहता यावर्षी आणखी मोठ्या प्रमाणात बस पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2025–26 या वर्षासाठी डेपो व्यवस्थापक आणि स्टेशन प्रमुखांना शाळा व महाविद्यालयांशी थेट संपर्क साधून सहलींचे नियोजन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
डेपो प्रमुखांना शाळांचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले असून ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक ठिकाणांना भेटीचे नियोजन करण्यावर भर दिला जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबाहेरच्या ज्ञानासोबतच सांस्कृतिक वारशाचीही ओळख होणार आहे.
एमएसआरटीसीची ही योजना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची ठरणार आहे. नव्या बस, स्वस्त भाडे आणि सुरक्षित प्रवास यामुळे पालकांचा आर्थिक भार कमी होणार असून शैक्षणिक सहलींना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.













