Maharashtra Schools : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल आणि किमान तापमान मोठ्या प्रमाणात कमी झाले असून यामुळे थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आता राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील काही शालेय विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळापत्रकात वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर बदल करण्यात येणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र विभागातील धुळे नंदुरबार जळगाव या तीन जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडत आहे.

यासोबतच नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही थंडीचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले असून याच वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर आता नाशिक जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच कडाक्याची गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये बोचरी थंडी अनुभवायला मिळत आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान दहा अंश सेल्सियसच्या खाली घसरले आहे.
शहरात नऊ अंश तर ग्रामीण भागात सात अंश सेल्सियसपर्यंत पारा खाली आल्याने सकाळच्या वेळी तीव्र गारवा जाणवत आहे. दरम्यान या कडाक्याच्या थंडीचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शालेय वेळापत्रकात बदल करणे आवश्यक आहे. आता हीच गोष्ट विचारात घेऊन आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून सकाळच्या सत्रातील शाळा एक तास उशिराने भरविण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने पुढे सरकवला आहे.
महत्त्वाची बाब अशी की या संदर्भातील निर्णय उद्या घेतला जाणार अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतेक शाळा दोन सत्रांमध्ये चालतात. सकाळच्या सत्राची सुरुवात सहसा सकाळी सात वाजता होत असल्याने विद्यार्थी पहाटे सहा ते सहा-साडेसहाच्या सुमारास घरातून बाहेर पडतात.
वाढत्या थंडीमुळे विद्यार्थी कुडकुडत शाळेत पोहोचत असल्याचे पालकांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. साथीचे आजार वाढू नयेत आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने शाळा उशिरा भरविण्याची मागणी पालकांनी यापूर्वीच केली होती.
दरवर्षी डिसेंबर-जानेवारीमध्ये हा निर्णय घेतला जातो; मात्र यंदा अतिवृष्टीनंतर थंडीचे प्रमाण लक्षणीय वाढल्याने नोव्हेंबर महिन्यापासूनच हा बदल लागू करावा, असा प्रस्ताव महापालिका शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांनी सादर केला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर शाळा उशिरा भरविण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला असून, त्याचे अवलोकन करून नाशिकमधील निर्णय प्रक्रियेला गती देण्यात येत आहे. यासंदर्भात अधिकारीवर्ग सोमवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेणार असून, त्यानंतर अंतिम आदेश जारी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान याबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासना अधिकारी डॉक्टर मीता चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी नोव्हेंबरपासूनच कडाक्याची थंडी जाणवत आहे. विद्यार्थ्यांसाठी सत्र उशिरा सुरू करण्याबाबत प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आता पुढील निर्णय घेतला जाणार आहे.













