Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अधिक खास ठरणार असून जर तुमच्याही घरात चौथी ते आठवीचे विद्यार्थी असतील तर तुम्ही ही बातमी नक्कीच शेवटपर्यंत वाचायला हवी.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती परीक्षेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2016 च्या आधी महाराष्ट्रात चौथी आणि सातवी या दोन वर्गांसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा होत असे. मात्र 2016 पासून शिष्यवृत्तीची परीक्षा पाचवी व आठवीच्या वर्गासाठी लागू करण्यात आली.

मात्र शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा शाळांना मोठा फटका बसला. या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे शाळांमधील पटसंख्या सातत्याने कमीच होत आहे. हेच कारण आहे की यावर उपाययोजना म्हणून आता शिष्यवृत्ती परीक्षेत 2016 नंतर पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे.
काय होणार बदल ?
मिळालेल्या माहितीनुसार, चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 – 26 मध्ये शिष्यवृत्तीची परीक्षा इयत्ता चौथी पाचवी सातवी आणि आठवीच्या वर्गांसाठी घेतली जाणार आहे. म्हणजे यावर्षी तब्बल चार वर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्तीची परीक्षा देण्यासाठी पात्र ठरणार आहे.
परंतु हा निर्णय तात्पुरत्या स्वरूपातला असून पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2026 – 27 पासून शिष्यवृत्तीची परीक्षा पूर्वीप्रमाणेच चौथी आणि सातवीच्या वर्गांसाठी घेतली जाणार आहे. खरतर शिष्यवृत्तीची परीक्षा चौथी आणि सातवीच्या वर्गांसाठी व्हावी अशी मागणी सातत्याने उपस्थित केली जात होती.
प्राथमिक शिक्षक संघटनांच्या माध्यमातून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे देखील ही मागणी उपस्थित करण्यात आली. मे महिन्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संघटनेने ही मागणी उपस्थित केली.
प्राथमिक शिक्षक संघटनेकडून शिष्यवृत्तीची परीक्षा पुन्हा एकदा चौथी आणि सातवीच्या वर्गांसाठी सुरू झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आणि याच मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण विभागाकडून यावर्षी चौथी, पाचवी, सातवी आणि आठवी या चार वर्गांसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाणार असून याबाबतचा आदेश लवकरच जारी होणार आहे.
या वृत्ताला शिक्षण विभागाकडूनही दुजोरा मिळालेला आहे. महत्त्वाची बाब अशी की यावर्षी चार वर्गांसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा होणार असली तरी देखील पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवी या दोनच वर्गांसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा होणार आहे.