Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अगदीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरतर उद्या दोन मे 2025 पासून राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना 26 एप्रिल 2025 पासूनच सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
पण राज्यातील शाळांना अधिकृतरित्या उद्यापासून म्हणजेच दोन मे 2025 पासून सुट्टी जाहीर होणार असून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आता नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात कधी होणार, आता शाळा कधी उघडणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पालकांकडूनही विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होण्याच्या तारखांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान आता याच संदर्भात राज्य शिक्षण विभागाकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. राज्य शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्याबाबतचे सविस्तर वेळापत्रक जारी केले आहे.
दरम्यान आता आपण या वेळापत्रकानुसार राज्यभरातील शाळा कोणत्या तारखेला सुरू होणार, पुणे जिल्ह्यातील शाळा कधी सुरू होणार तसेच विदर्भातील शाळाबाबत राज्य शिक्षण विभागाने नेमका काय निर्णय घेतलाय? याची डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक?
मिळालेल्या माहितीनुसार चालू शैक्षणिक वर्षातील शाळांना म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शाळांना उद्या दोन मे 2025 रोजी उन्हाळी सुट्टी लागणार आहे. उन्हाळी सुट्टी दोन मे पासून सुरू होईल आणि 14 जून 2025 पर्यंत उन्हाळी सुट्टी राहणार आहे.
दरम्यान, 16 जून 2025 पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे, म्हणजेच या दिवशी शाळा सुरू होणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2025-26 हे 16 जून 2025 पासून सुरु होणार आहे. संपूर्ण राज्यभरात 16 जून पासून नियमित शालेय सत्राला सुरुवात होणार आहे म्हणजेच पुणे जिल्ह्यात सुद्धा 16 जून पासून नेहमीच शालेय सत्र सुरू होईल अशी माहिती राज्य शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे.
परंतु विदर्भासाठी वेगळा निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर विदर्भात जून महिन्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात तापमान असते आणि याच तापमानाच्या पार्श्वभूमीवर विदर्भासाठी वेगळा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विदर्भ विभागातील म्हणजेच नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम आणि गडचिरोली या 11 जिल्ह्यांमध्ये 23 जून पासून शाळा सुरू होणार आहेत आणि 23 जून ते 28 जून दरम्यान शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जातील. परंतु 30 जून 2025 पासून विदर्भातील या संबंधित जिल्ह्यांमध्ये देखील नियमित वेळेत शाळा भरणार आहेत.