Maharashtra Schools : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था देखील उच्च शिक्षणासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता विशेष योजना राबवते. दरम्यान महाराष्ट्रातील विद्यार्थी-केंद्रित योजनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या याचं योजनेत आता एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला.

महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)ने JEE, NEET आणि MHT-CET या राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांसाठी राबविल्या जाणाऱ्या “फ्री टॅबलेट प्रशिक्षण योजना 2025-27” मध्ये मोठा बदल जाहीर केला आहे.
योजनेत पात्र ठरलेल्या आणि मेरिट लिस्टमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अद्यतनात्मक सूचना असून यावर्षीपासून आर्थिक सहाय्याचे नवे स्वरूप लागू करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट पूर्वीप्रमाणेच दिला जाणार आहे, मात्र पूर्वी टॅबलेटसोबत मिळणारे सिम कार्ड आणि इंटरनेट रिचार्जचे अनुदान यंदापासून रोख स्वरूपात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवले जाईल.
प्रत्येक विद्यार्थ्याला इंटरनेटसाठी होणाऱ्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी दरमहा 500 रुपये इतकी आर्थिक मदत देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम महिन्याला दिली जाणार नसून दर तीन महिन्यांनी एकत्रित 1500 रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होईल.
अनुदान मिळवण्यासाठी आधार सीडिंग हा सर्वात महत्त्वाचा निकष ठरवण्यात आला आहे. विद्यार्थ्याचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेत असणे आणि ते खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे अनिवार्य आहे. खाते आधारशी जोडले नसेल तर तिमाही अनुदान जमा केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा महाज्योतीने दिला आहे.
टॅबलेट वाटपाबाबतही महत्त्वाची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वाटपाच्या फक्त दोन दिवस आधी महाज्योती कार्यालय यांच्याकडून अधिकृत फोन करून कॉलद्वारे सूचना केली जाईल.
विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून टॅबलेट घ्यावा लागेल. टॅबलेट घेताना आधार कार्ड आणि भरलेल्या अर्जाची छायाप्रत बाळगणे आवश्यक राहणार आहे.
महाज्योतीच्या या सुधारित योजनेमुळे हजारो विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक साधनांबरोबरच इंटरनेटसाठी आर्थिक सक्षमताही उपलब्ध होणार आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी त्वरित आपले बँक खाते आधारशी जोडले आहे याची खात्री करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.













